लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे

• छावा • अमरावती, दि. १४ जून • वृत्तसंस्था
शेतकरी, दिव्यांग तसेच इतर उपेक्षित घटकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आमदार बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज लेखी आश्वासनानंतर संपुष्टात आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या वतीने महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र आंदोलकांना सुपूर्त केल्यानंतर कडू यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली.
गेल्या सात दिवसांपासून गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या या उपोषणस्थळी आज आमदार अमोल मिटकरी, माजी खासदार कमलताई गवई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याआधीही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष भेट देत आंदोलकांच्या मागण्यांवर शासन स्तरावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगितले. काही मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात आला असून उर्वरित मागण्यांसाठीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बच्चू कडू यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने तातडीने निर्णय घेतल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
“शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी आश्वासनामुळे व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उपोषणाची सांगता करत आहे. लवकरच शासनाशी सविस्तर चर्चा करून मागण्या मार्गी लावण्यासाठी पुढील पावले उचलली जातील,” असे आमदार बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
शासनावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि आंदोलन शांततेत संपविल्याबद्दल मंत्री सामंत यांनी बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.