अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा पुढाकार
• जिल्हास्तरीय एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न
• विविध विभागांना निर्देश
• छावा • सांगली, दि. १० • वृत्तसंस्था
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या (२६ जून) पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अंमली पदार्थ विरोधी जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, “२६ जून रोजी सकाळी ११ वाजता सर्व शासकीय, खाजगी शाळा, महाविद्यालये, सरकारी व निमसरकारी आस्थापने, उद्योग आदी ठिकाणी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात यावी. यासाठी सर्व संबंधित विभागांनी तत्काळ नियोजन करून कृती आराखडा तयार करावा.”
या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त सत्यम गांधी, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा सह आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी (जिल्हा उद्योग केंद्र), प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे (MIDC), सहाय्यक आयुक्त रा.अ. समुद्रे (F.D.A), शिक्षणाधिकारी व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी, शाळांमध्ये प्रतिज्ञा परिपाठाच्या वेळी नियमित घ्यावी. निबंध, चित्रकला स्पर्धा घ्याव्यात. डार्क स्पॉट, उद्याने, पार्क याठिकाणी लाईट व CCTV बसवून गस्त वाढवावी, एमआयडीसीतील कारखाने व मेडिकल दुकाने येथे CCTV यंत्रणा कार्यान्वित आहेत की नाही, याची तपासणी करावी अशा विविध सूचना केल्या आहेत.
पोलीस विभागाची आकडेवारी
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी माहिती दिली की, “मागील दीड महिन्यात अमली पदार्थ विरोधी कारवाईअंतर्गत ६० गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६८ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये १०.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.”
जनजागृतीसाठी सर्व विभागांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून, शिक्षण, आरोग्य, पोलीस, आरटीओ, उद्योग, एसटी महामंडळ, पोस्ट ऑफिस, नगरपालिका यांसह सर्व विभागांनी या दिशेने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.