१५वे विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन
२२ वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्याला यजमान
क्रांतिसिंह नाना पाटील तथा प्रतिसरकारला समर्पण
छावा • सातारा, दि.१० जून • प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्रोही साहित्य-संस्कृती चळवळीचे १५वे राज्यस्तरीय संमेलन यंदा सातारा येथे होणार आहे. संमेलनाची माहिती अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि सचिव डॉ. जालिंदर घिगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यातील विशेष बाब म्हणजे २२ वर्षांनंतर साताऱ्याला पुन्हा या ऐतिहासिक संमेलनाचे यजमानपद मिळाले असून, हे संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि साताऱ्याच्या ऐतिहासिक प्रतिसरकाराच्या स्मरणार्थ समर्पित करण्यात आले आहे. देशाच्या इतिहासातील हे एकमेव स्वयंचलित जनआंदोलन होते, ज्यात लोकशाही मूल्यांची पायाभरणी झाली होती.
संमेलनाचे वैशिष्ट्य
यंदाच्या संमेलनात ‘सामाजिक परिवर्तन आणि लोकसाहित्य’, ‘भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांचा आढावा’, ‘वारी व ग्रामीण साहित्य’, ‘आदिवासी सशस्त्र संघर्षाचा इतिहास’ यांसारख्या ज्वलंत विषयांवर परिसंवाद होतील. तसेच, विद्रोही शाहिरी, कवीसंमेलन, सांस्कृतिक सादरीकरण आणि विचारमंथन सत्रांतून जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाईल.
कॉ. धनाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, सचिव डॉ. जालिंदर घिगे, अॅड. सुभाष पाटील, डॉ. दिनकर दळवी, व्ही. वाय. पाटील यांसारख्या अनेक कार्यकर्ते, साहित्यिक व अभ्यासक संमेलनाच्या यशासाठी सक्रिय आहेत.
विद्रोही साहित्य चळवळ ही केवळ साहित्यिक व्यासपीठ न राहता, अन्याय, विषमता, जातीय वर्चस्ववाद, भांडवली शोषण आणि सत्ताकेंद्रित संस्कृतीविरोधात उभा राहिलेला सांस्कृतिक लढा आहे. या चळवळीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या तळागाळातील लेखक, शाहीर, कलाकार आणि विचारवंतांना व्यासपीठ दिले आहे.
यापूर्वी २००२ मध्ये डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात चौथे संमेलन पार पडले होते. हे संमेलन म्हणजे केवळ साहित्यिक गोष्टींचे नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाशी संवाद साधणारा एक सशक्त जनआंदोलनात्मक प्रयोग ठरणार आहे.