११ वर्षांचा प्रचार सोडून जबाबदारी घ्या”
रेल्वे अपघातावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
• छावा • मुंबई, दि. १० जून • प्रतिनिधी
मुंबईतील मुंब्रा परिसरात झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “देशातील वास्तव परिस्थिती दुर्दैवी अपघातांमधून समोर येत असताना केंद्र सरकार त्यांच्या ११ वर्षांच्या कार्याचा उत्सव साजरा करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंय, “भारतीय रेल्वे ही कोट्यवधी नागरिकांच्या जीवनाचा कणा आहे. मात्र, आज ती असुरक्षितता, अति गर्दी आणि व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीचं प्रतीक बनली आहे. मोदी सरकारच्या ११ वर्षांमध्ये जबाबदारी नाही, बदल नाही – फक्त प्रचार आणि प्रसिद्धी आहे.”
मुंबई रेल्वेचा गतीमान आणि असुरक्षित चेहरा
मुंबईसारख्या महानगरात उपनगरी रेल्वे ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, तांत्रिक बिघाड आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे अपघातांच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अलीकडच्या दुर्घटनेने याच चिंतेची पुन्हा जाणीव करून दिली आहे.
सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही
रेल्वे मंत्रालय किंवा केंद्र सरकारकडून या अपघातावर अधिकृत तपशील वा उत्तर अद्याप आलेले नाही. मात्र, अपघातग्रस्त प्रवाशांमध्ये आणि मुंबईकरांमध्ये संताप आणि अस्वस्थता व्यक्त होत आहे.