राज्यातील पहिली महसूल लोकअदालत पुणे जिल्ह्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
छावा • पुणे, दि. ९ जून| प्रतिनिधी
राज्यातील पहिली महसूल लोक अदालत पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली असून, याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विशेष उपक्रमात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीला नवसंजीवनी मिळणार असून, सामान्य नागरिकांच्या महसूलसंबंधित तक्रारींना जलद आणि न्याय्य तोडगा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
या उद्घाटनप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यभर महसूल लोक अदालती राबविण्याचा निर्णय
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, “पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे महसूली दावे आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहे. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोक अदालतीची मोहीम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहे.”
महसूल विभागासाठी अत्याधुनिक वाहने उपलब्ध होणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले की, नागपूर जिल्ह्यात महसूल विभागासाठी बहुउद्देशीय (मल्टिपर्पज) अत्याधुनिक वाहने देण्यात आली असून, याच धर्तीवर पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण महसूल विभागीय मुख्यालयांनाही यावर्षी अशी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमता व त्वरित प्रतिसाद क्षमतेत लक्षणीय वाढ होईल, असेही त्यांनी नमूद केले.
महसूल लोक अदालतीमुळे केवळ प्रशासनाचा विश्वास वाढणार नाही, तर सामान्य नागरिकांच्या न्यायप्राप्तीचा मार्ग सुकर होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या पुढाकारामुळे राज्यात महसूल व्यवहार सुलभ, पारदर्शक आणि जनतेच्या हिताचे ठरणारे ठरतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.