कोळी समाजाच्या श्रद्धेचा संगम : मुरुडमध्ये कालभैरव मंदिराचे भव्य उद्घाटन
छावा, दि .०९ | मुरुड (रायगड) | प्रतिनिधी |
मुरुड कोळीवाड्यात कालभैरव मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला उत्साही आणि भावनिक वातावरण लाभले. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या चित्रलेखा पाटील यांनी समाजाच्या श्रद्धेला योग्य न्याय देत आपली बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली.
चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने आणि निधीच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या या मंदिरासाठी सुमारे ९ ते १० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, मंदिराच्या बांधकामात दर्जा, सौंदर्य आणि भक्ती यांचा समतोल साधण्यात आला आहे.
या उद्घाटन प्रसंगी ढोल-ताशांचा गजर, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामस्थांचे प्रेमळ स्वागत आणि एकूणच उत्सवमूर्ती वातावरण पाहून पाटील भावुक झाल्या. मंचावरून बोलताना त्यांनी कोळी समाजाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “हा समाज चेहऱ्यावर हसू ठेवून मनातलं दुःख लपवतो, समुद्राशी आपलं नातं जपतो आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगतो. कोळी बांधव म्हणजे जीवाला जीव देणारा समाज.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, केवळ आश्वासन देण्याऐवजी त्यांनी आपल्या वचनाची पूर्तता करत मंदिर उभारलं, जे केवळ एक धार्मिक स्थळ नसून समाजाच्या श्रद्धा, प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे.
या प्रसंगी स्थानिक नागरिक, महिलावर्ग, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी पाटील यांना ज्या प्रेमाने आणि आदराने सामावून घेतलं, ते दृश्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरलं. कोळी समाजाच्या संस्कृतीप्रेमाची आणि एकतेची ही साक्ष देणारा प्रसंग म्हणून या कार्यक्रमाची नोंद घेतली जात आहे.
चित्रलेखा पाटील यांच्या या कार्याने केवळ एक मंदिर नव्हे तर समाजाभिमान, निष्ठा आणि सहभावाचे प्रतीक उभं राहिलं आहे. कोळीवाड्याच्या हृदयात उभं राहिलेलं हे मंदिर भविष्यात अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.