कायद्यापलीकडील करुणामय कर्तव्य “भूतदया”

चिपळूण पोलिसांची हृदयस्पर्शी यशोगाथा

छावा ; दि. ०८ जून | चिपळूण | प्रतिनिधी

कधी कधी माणुसकीची खरी ओळख कुणा शब्दांमध्ये नाही, तर कृतीत दिसते… आणि अशाच एका क्षणी चिपळूण पोलिसांनी मूक प्राण्याच्या वेदनेवर फुंकर घालणारा माणुसकीचा हात पुढे केला.

आपल्या देशात गाईला माता मानले जाते, पण जेव्हा अशी गाय भुकेने व्याकूळ, अशक्त आणि जखमी अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसते, तेव्हा तिच्यावर दया येते. अशाच एका मूक प्राण्याला जीवनदान देण्याचे माणुसकीचे उदाहरण चिपळूण पोलिसांनी घालून दिले आहे.

चिपळूण पोलीस स्थानकाच्या परिसरात काही दिवसांपूर्वी एक जखमी, अशक्त आणि उपासमार झालेली गाय चरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ना तिला कुणी आवाज दिला किंवा ना तिने कुणाच्या पुढ्यात याचनेचा हंबरडा फोडला, पण तिच्या डोळ्यांतली वेदना पोलिसांच्या मनाला भिडली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या धावपळीतही पोलिसांच्या संवेदनशील नजरेने तिचं दु:ख हेरलं… आणि सुरू झाला एका ‘मूक जीवाच्या जीवनदानाचा’ प्रयत्न…….

तात्काळ संवेदनशीलता दाखवत पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांनी पुढाकार घेतला आणि ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्याशी संपर्क साधून गायीसाठी मदत मागितली. “ही गाय वाचवायला हवी,” असं मनोमन ठरवलेलं होतं. कोकरे महाराज यांनी आपल्या लोटे (ता. खेड) येथील गोशाळेत गायीला आणण्याची तयारी दर्शवली.

यानंतर हिंगे यांच्यासह पोलीस हवालदार अशोक शिंगाडे, पोलीस हवालदार समीधा पांचाळ, आणि पोलीस अंमलदार प्रीतम शिंदे या अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत कुठलीही औपचारिकता न करता, कुठलाही गाजावाजा न करता, त्यांनी त्या गायीला हाताने वाहनात चढायला मदत केली आणि गोशाळेच्या दिशेने रवाना करत एका सुरक्षित नवजीवनाच्या दिशेने वाट दाखवली. यातील विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमाचा खर्च पोलिसांनी स्वतःच्या खिशातून केला.

त्या मूक गायीच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये ‘कृतज्ञतेचा शब्द’ नव्हता, पण प्रत्येक अश्रूत “धन्यवाद” लपलेलं होतं – अशा माणसांना, जे अजूनही संवेदनशील आहेत.

गायीला गोशाळेत पोहोचवून तिच्यावर योग्य उपचार सुरू झाले आहेत. तिचं संगोपन आता सुरक्षीत हातात आहे. ही एक छोटीशी कृती वाटू शकते, पण तिच्यामागे लपलेली भावना म्हणजे माणुसकीचा सर्वोच्च मानदंड…!

चिपळूण पोलिसांच्या या भावनिक आणि माणुसकीने ओथंबलेल्या कृतीमुळे शहरात केवळ गायच वाचली नाही, तर अनेक मनांत पोलीस प्रशासनाबद्दल आदर निर्माण झाला. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी संवेदनशील समाजभान ठेवून काम करत असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.

मोहिमेचे पुढारी

या करुणामय कर्तव्यासाठी पुढाकार घेऊन भूतदयेचा नवा मानदंड प्रस्थापित करणारे पीएसआय हर्षद हिंगे २०१४ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे पोलीस खात्यात रुजू झाले. मूळचे पुणे तालुक्यातील मावळ प्रांतातील असणारे हर्षद हिंगे साहेब त्यांच्या मेहनती आणि चिकाटी वृत्तीमुळे कोणत्याही कोचिंगचा आधार न घेता स्व: अध्ययनाद्वारे विविध शासकीय परीक्षांमध्ये यश मिळवलेले अभ्यासू व्यक्ती आहेत. विविध शासकीय पदातील संधी स्वतःसाठी निर्माण करून सुद्धा जनसेवेसाठी सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रिदाखाली कर्तव्य देण्याच्या आंतरिक इच्छेमुळे त्यांनी पोलीस विभागाची निवड केली. चिपळूण येथे कर्तव्यावर दाखल होण्याआधी वर्ष २०१७ ते २०२० या कालावधीत त्यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील रेवदंडा पोलीस ठाणे येथे कर्तव्यसेवा दिली आहे.

हर्षद साहेबांकडे आलेले खटले, फिर्यादी तसेच कायदा आणि सुव्यवस्था यासाठी त्यांच्या प्रभारांतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमा यामध्ये वैधानिक पातळीवर आवश्यक ती कारवाई करून दमदार कामगिरी करण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. कर्तव्यप्रसंगी अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोर व्यक्तित्व राखणारे हिंगे साहेब एरवी मनमिळाऊ आणि संवेदनशील वृत्तीचे असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. या घटनेमुळे त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तीची ओळख घडलीच आहे.

माणूस म्हणून काहीतरी चांगलं केलं… हाच खरा पुरस्कार!” कायद्याचे रक्षण करणारा आणि त्यासाठी प्रसंगी कठोर होणारा वर्दीतला माणूस प्रसंगी संवेदनशील भावनेने माणसांसोबतच मूक जनावरालाही नवसंजीवनी देण्यासाठी मदत करू शकतो हे या घटनेने सिद्ध केले आहे.” :- प्रतिक कणसे, चिपळूण

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *