एक झाड आईच्या नावाने मोहिमेचे पर्व २.०
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
दिल्लीतील २०० इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था, ५ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक झाड आईच्या नावाने २.०’ या वृक्षारोपण मोहिमेचा अधिकृत प्रारंभ केला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी राजधानी दिल्लीतल्या महावीर जयंती उद्यानात वृक्षारोपण करून मोहिमेला सुरुवात केली.

ही मोहिम एका भावनिक व सांस्कृतिक संदर्भात साकारण्यात आली असून, आपल्या मातेसमर्पित एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाबाबत जागरुकता वाढवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मागील वर्षी बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे झाड लावून या उपक्रमाचा प्रारंभ पंतप्रधानांनी केला होता. यंदाच्या ‘२.०’ टप्प्यात जून ५ ते सप्टेंबर ३० या कालावधीत देशभरात एकूण १० कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले की, “या #WorldEnvironmentDay निमित्त, आपण आपल्या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक कटिबद्ध होऊया. पर्यावरण सेंद्रिय बनवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.”

या वृक्षारोपण उपक्रमाद्वारे मातांचा आणि झाडांचा जीवन पोषणामधील महत्वाचा सहभाग अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. या प्रतीकात्मक कृतीमुळे संस्कृती व पर्यावरणाची सांगड घालण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
त्याचबरोबर, पंतप्रधान मोदींनी आज दिल्ली सरकारच्या शाश्वत सार्वजनिक वाहतूक उपक्रमांतर्गत २०० इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवला. या ग्रीन बसेसच्या माध्यमातून राजधानी दिल्लीत हवेचे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असून, शाश्वत आणि स्वच्छ वाहतुकीचा वापर प्रोत्साहित होणार आहे.

एका अन्य पोस्टमध्ये पंतप्रधानांनी भारतातील वनक्षेत्रात झालेली वाढही अधोरेखित केली. “गेल्या दशकात देशभरात एकत्रित प्रयत्नांमुळे वनक्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब आपल्या शाश्वत विकासाच्या दिशेने झालेली महत्त्वपूर्ण वाटचाल आहे,” असे त्यांनी नमूद केले.