छावा filmfare जब मौत सामने खड़ी थी तब उसने जीना चुना दर्द से भक्ति तक का सफर संतोष मोरे

 आजचा हा विशेष लेख… एका अशा माणसाचा आहे, ज्याने मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून आयुष्य पुन्हा जिंकलं!

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रेवदंडा १0 एप्रिल २०२६

रेवदंडा परिसरातील नारायण आळी येथे राहणारे संतोष सदाशिव मोरे (बाबू-भाई) हे नाव आज केवळ एका व्यक्तीचं नाही, तर जिद्द, श्रद्धा आणि नव्याने जगण्याची प्रेरणा देणारी एक जिवंत कहाणी बनली आहे. माजी उपसरपंच सदाशिव गणपत मोरे यांचे ते मोठे चिरंजीव. वडिलांकडूनच त्यांना समाजकारणाचे आणि राजकारणाचे धडे मिळाले. गावातील सभा, लोकांचे प्रश्न आणि सामाजिक कार्य या वातावरणातच त्यांचे बालपण गेले. तसेच माननीय मीनाक्षीताई पाटील यांच्या मार्गदर्शनातून त्यांची सामाजिक जाण अधिक सक्षम झाली.

        सचिन मयेकर      

लहानपणापासूनच त्यांना संगीताची आणि भजनाची ओढ होती. शाळेत असतानाच भजन, ऑर्केस्ट्रा आणि गॅदरिंगमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत. त्या वयात लागलेली ही आवड पुढे त्यांच्या आयुष्याचा आधार बनेल, याची कल्पना त्यांनाही नव्हती.

आजपासून साधारण २५ ते २६ वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक विलक्षण घटना घडली  संकष्टीच्या दिवशी त्यांना श्री गणपतीचे स्वप्नात दर्शन झाले. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी त्या दिवसापासून प्रत्येक संकष्टीच्या मांसाहार पूर्णपणे बंद केला, उपवास सुरू केला आणि साळाव येथील बिर्ला मंदिरात श्री गणपतीसमोर भजन करण्याची सेवा सुरू केली. आणि तेव्हापासून आजपर्यंत 

गेली २५ वर्षे अखंड, नित्यनेमाने संकष्टीला भजन

ही केवळ परंपरा नाही… ही भक्तीची अखंड साधना आहे.पण आयुष्याचा खरा कस अजून बाकी होता…कॉलेजच्या जीवनात सहज मित्रांच्या संगतीतून लागलेली एक सवय  तंबाखू

सुरुवातीला मस्ती म्हणून घेतलेली ही सवय कधी जीवावर बेतणार आहे, याची कल्पनाही नव्हती. हळूहळू ही सवय वाढत गेली… आणि एक दिवस ती थेट जबड्याच्या कॅन्सरपर्यंत घेऊन गेली.

क्षणात आयुष्य कोलमडलं…मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं…महिनेन्‌महिने चाललेली उपचारांची झुंज…जगतो की मरतो? अशा अवस्थेतला प्रत्येक दिवस…हा काळ शरीराचा नव्हता…तो मनाचा, आत्म्याचा आणि कुटुंबाच्या सहनशक्तीचा कस लावणारा होता.त्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं त्यांचं कुटुंब  आई, वडील, पत्नी सोनाली, मोठी मुलगी आणि संपूर्ण परिवार. देवाची कृपा आणि कुटुंबाचे आशीर्वाद यांच्या जोरावर संतोष मोरे मृत्यूच्या दारातून परत आले.आणि त्या क्षणी त्यांनी मनाशी एक शपथ घेतली 

जर मी जिवंत राहिलो… तर आयुष्य फक्त चांगल्यासाठी जगायचं.

ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती पूर्णपणे खालावली होती. शरीर साथ देत नव्हतं… पण जिद्द अजून जिवंत होती. त्यांनी व्यायाम सुरू केला… स्वतःला पुन्हा घडवलं… आणि आज त्यांनी जबरदस्त बॉडी कमावली आहे.

याच नव्या जिद्दीने त्यांनी आयुष्याची दिशा बदलली. अवघ्या ५० हजार रुपयांपासून सुरू केलेला प्रवास त्यांनी इमारती बांधण्याच्या व्यवसायात पुढे नेला. आज “वैष्णवी कन्स्ट्रक्शन” या नावाने ते बिल्डिंग मटेरियल सप्लायर आणि बांधकाम व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत.

 नवजीवनाचं प्रतीक – वैष्णवी

मृत्यूशी झुंज देऊन परत आलेल्या त्यांच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आला  त्यांच्या धाकट्या मुलीच्या रूपाने. वैष्णवी… ही फक्त मुलगी नाही, तर त्यांच्या नव्या आयुष्याचं प्रतीक आहे. आजारावर मात केल्यानंतरच तिचा जन्म झाला…आणि जणू त्यांच्या जीवनाला पुन्हा रंग आला…जगण्याची नवी ताकद मिळाली…लढण्याची नवी प्रेरणा मिळाली…म्हणूनच त्यांनी आपल्या व्यवसायालाही “वैष्णवी कन्स्ट्रक्शन” हे नाव दिलं.आज ते केवळ स्वतः उभे राहिले नाहीत…तर कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करण्याचं कामही करत आहेत.साळाव बिर्ला मंदिरातील त्यांचे भजन हे केवळ कार्यक्रम नसतात  ते एक आध्यात्मिक अनुभव असतो. गेल्या २५ वर्षांच्या अखंड सेवेसाठी त्यांचा मंदिर कमिटीतर्फे सत्कारही करण्यात आला आहे. राजकारणाची परंपरा आणि कुटुंबाची ताकद

संतोष मोरे यांचे कुटुंब हे सुरुवातीपासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले आहे. त्यांचे वडील सदाशिव गणपत मोरे यांनी कित्येक वर्षे उपसरपंच पद भूषवले असून गावाच्या विकासात मोठा वाटा उचलला आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवत संतोष मोरे आज रेवदंडा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी सोनाली संतोष मोरे यांनीही जिद्दीने पुढे येत सरपंच पद भूषवले होते. कुटुंबातील तिन्ही पिढ्यांनी समाजासाठी उभं राहण्याची परंपरा जपली आहे. आज संतोष मोरे यांची कहाणी एकच गोष्ट शिकवते  व्यसन माणसाला मृत्यूच्या दारात नेऊ शकतं… पण जिद्द, श्रद्धा आणि कुटुंबाची साथ असेल तर तोच माणूस मृत्यूवर मात करून नव्याने जगू शकतो. भक्ती, संघर्ष, जिद्द आणि पुनर्जन्म यांचा संगम म्हणजे 

संतोष मोरे.

भाग २ पुढील शुक्रवारी 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *