गॅस टंचाईचा स्फोट! रांगा, दरवाढ आणि धंदे बंद; गोरगरिबांवर उपासमारीची वेळ
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल रायगड रविवार २९ मार्च २०२६
देशभरात गॅस टंचाई, वाढते दर आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. ताज्या वृत्तानुसार काही ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्याचे दिसून येत असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढत आहे.
राजस्थानमधील जयपूर येथे गॅस टंचाईच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व गोविंद सिंग डोटासरा यांनी केले. तर विरोधी पक्षनेते टिकराम जुली यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की लोकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, तरीही अधिकृतपणे टंचाई नाकारली जात आहे आणि वाढत्या दरांमुळे गरीबांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे.
परिस्थिती लपवली जात असल्याचा आरोप
विरोधकांच्या मते, गॅस सिलेंडर मिळण्यात उशीर, एजन्सीबाहेर रांगा आणि वाढते दर या सर्व गोष्टींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थिती गंभीर असताना ती लपवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
✍ सचिन मयेकर
दरवाढीमुळे चिंता वाढली
गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे घरगुती खर्च वाढला असून छोटे व्यवसाय अडचणीत आले आहेत आणि महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे पुढे महागाई आणखी वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
लोकांचा संताप आणि वास्तव
काही ठिकाणी नागरिकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत, वेळेवर सिलेंडर मिळत नाही आणि किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे नाराजी वाढताना दिसत आहे. कागदावर सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात नागरिकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत असल्याची भावना अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे.
“व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे काही छोटे विक्रेते घरगुती गॅस सिलेंडर वापरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नियमांनुसार हे अयोग्य असले तरी उदरनिर्वाहासाठी पर्याय नसल्याने ते हा मार्ग अवलंबत असल्याचे सांगितले जाते.”
दरम्यान, सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जात असले तरी जमिनीवर वेगळीच परिस्थिती दिसत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
गावोगावी लॉकडाऊनसारखी परिस्थिती
एकीकडे सरकारकडून देशात कोणताही लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले जात असताना, दुसरीकडे गावोगावी आणि खेडोपाडी मात्र वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. गॅसच्या कमतरतेमुळे चहा विक्रेते, वडापाव विक्रेते तसेच छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांचे धंदे अडचणीत आले असून अनेकांना दुपारनंतर दुकाने बंद ठेवण्याची वेळ येत आहे.
सरकार म्हणते लॉकडाऊन नाही, पण आमच्यासाठी ही लॉकडाऊनसारखी परिस्थितीच आहे, अशी परखड भावना व्यावसायिक आणि सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. या परिस्थितीमुळे रोजंदारीवर चालणाऱ्या कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.
गोरगरिबांवर सर्वाधिक फटका
आजची वस्तुस्थिती अशी आहे की काही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू असला तरी गोरगरिबांच्या छोट्या धंद्यांवर मात्र गॅस टंचाईचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे. चहा विक्रेते, वडापाव विक्रेते तसेच हातावर पोट भरणारे अनेक छोटे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काहींसाठी व्यवसाय सुरू आहे, पण आमच्यासाठी जगणंच कठीण झालंय, अशी वेदनादायी भावना स्थानिकांमध्ये उमटत आहे.
हा लॉकडाऊन नाही, तर मग काय
यातूनच एक कटू वास्तव समोर येत आहे. अनेकांसाठी ही परिस्थिती म्हणजे जणू सरकारने घोषित न केलेला लॉकडाऊन असल्यासारखीच भासत आहे. कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र गोरगरिबांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत आहे.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की लोकांना जणू पुन्हा काही वर्षे मागे गेल्यासारखे वाटत आहे. आधुनिक गॅसवर चालणारे स्वयंपाकघर सोडून अनेकांना पुन्हा पारंपरिक चुली पेटवाव्या लागत आहेत.
काळाबाजाराचा वाढता धोका
दरम्यान, गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जास्त पैसे देणाऱ्यांना सिलेंडर मिळत असल्याच्या चर्चा असून याचा सर्वाधिक फटका गोरगरिबांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाची सूचना
ही परिस्थिती काही भागात दिसून येत असून अधिकृतरीत्या कोणताही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
![]()

