रविवार विशेष — कैद देहाची झाली, विचार कधीच कैद झाला नाही — १ फेब्रुवारी १६८९, स्वराज्य हादरलं… छावा अमर झाला 🚩

- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 रविवार , १ फेब्रुवारी २६
रविवार विशेष
१६८९ सालचा १ फेब्रुवारी…
स्वराज्याच्या इतिहासात काळ्या शाईने कोरलेला, पण बलिदानाच्या सोन्याने उजळलेला दिवस. हा तो दिवस आहे, ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज गनिमी काव्याने कैद झाले. तो क्षण केवळ एका राजाच्या पकडीचा नव्हता, तर स्वराज्याच्या छातीत घुसलेल्या वेदनेचा होता.
त्या काळात मुघल बादशहा औरंगजेब स्वतः दख्खनेत उतरला होता. मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्रस्त झालेल्या मुघल सत्तेला एकच ध्यास लागला होता—संभाजी महाराजांना जिवंत पकडण्याचा. याच पार्श्वभूमीवर संभाजी महाराज कोकणातील संगमेश्वर येथे गेले होते. हा दौरा युद्धासाठी नव्हता, तर राजकीय व रणनैतिक कारणांसाठी होता. कोकणातील देशमुख, वतनदार यांची निष्ठा तपासणे, पोर्तुगीज व मुघल हालचालींवर लक्ष ठेवणे आणि पुढील मोहिमांची आखणी करणे, हा या भेटीमागचा उद्देश होता. त्यामुळे महाराजांसोबत मोठं सैन्य नव्हतं; मोजकेच विश्वासू मावळे आणि कवी-राजनितिज्ञ कवी कलश होते.
हीच संधी मुघल सरदार मुक्करब खानने साधली. अचानक, अंधाराचा फायदा घेत संगमेश्वरवर हल्ला झाला. थोड्या सैन्याने हजारोंशी मुकाबला केला. रणांगण रक्ताने लाल झालं. कवी कलश वीरमरण पावले. स्वतः संभाजी महाराज जखमी झाले आणि अखेर गनिमी डावात पकडले गेले. त्या क्षणी सह्याद्री स्तब्ध झाला, कोकण हादरलं आणि स्वराज्याचं आकाश काळवंडलं.
या कैदेआधीचा एक क्षण मात्र इतिहासात शब्दांत नाही, पण तो मराठी मनात खोलवर कोरलेला आहे—रायगडावरून निघताना झालेली शेवटची भेट. मोहिमेला निघताना संभाजी महाराजांनी येसूबाईंना निरोप दिला होता. हा दौरा वेगळा आहे, धोक्याचा आहे, याची जाणीव दोघांनाही होती. शब्द कमी होते, पण डोळ्यांतून बरंच काही सांगितलं गेलं. “स्वराज्यासाठी जातोय,” एवढंच म्हणत महाराज निघाले. येसूबाईंनी अश्रू लपवले, कपाळावर हात ठेवून आशीर्वाद दिला. ती भेट शेवटची ठरेल, याची जाणीव असूनही राणीने राजाला अडवलं नाही—कारण स्वराज्य राणीपेक्षा मोठं होतं.
त्या वेळी महाराजांचा लहान मुलगा, शाहू, रायगडावरच होता. इतिहास त्याक्षणाचे तपशील देत नाही, पण कल्पना करायला कठीण नाही—एका बापाने आपल्या मुलाला कुशीत उचलून, काहीही न बोलता घट्ट धरून ठेवणं. कारण राजाला माहीत होतं, हा निरोप फक्त बापाचा नसून स्वराज्याच्या वारसाला दिलेला निरोप आहे.
कैदीनंतर संभाजी महाराजांवर अमानुष छळ करण्यात आला. साखळ्यांत बांधून, जनतेसमोर फिरवून, अपमानित करण्याचा प्रत्येक प्रयत्न झाला. धर्म बदलण्याचा दबाव टाकला गेला. पण महाराज झुकले नाहीत. त्यांनी धर्म सोडला नाही, स्वराज्याशी बेईमानी केली नाही आणि औरंगजेबासमोर मान तुकवली नाही. मरण स्वीकारलं, पण पराभव नाही.
म्हणूनच आजही हा दिवस केवळ शोकाचा नाही. हा दिवस आठवणीचा, जागृतीचा आणि निष्ठेचा आहे. त्यामुळेच संभाजी महाराजांचा मासिक महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाळला जातो. पुण्यात अनेक शिवप्रेमी संस्था, व्यायामशाळा आणि शिवसंघटना दरमहा दिवा लावून, पोवाडे गाऊन, महाराजांना अभिवादन करतात. तुळापूर, जिथे महाराजांनी बलिदान दिलं, तिथे हा मासिक अधिक गंभीर आणि शांत वातावरणात पाळला जातो. वढू बुद्रुक, जिथे अंत्यसंस्कार झाले, तिथे श्रद्धा अधिक गहिर्या रूपात व्यक्त होते. कोल्हापूर, सातारा आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांतही हा मासिक निष्ठेने पाळला जातो—कुठे मोठ्या कार्यक्रमाने, तर कुठे फक्त एका पणतीने.
१ फेब्रुवारी हा दिवस इतिहासाला एकच सत्य सांगतो—राजा कैद झाला, पण विचार कैद झाला नाही. देह संपला, पण ध्येय अमर झालं. संभाजी महाराज गेले, पण त्यांच्या बलिदानातून स्वराज्य अधिक पेटून उठलं.
आजही, प्रत्येक मासिकात, प्रत्येक दिव्यात, प्रत्येक पोवाड्यात एकच आवाज घुमतो
राजा हरला नाही…
छावा अमर झाला.
🚩 जय छत्रपती संभाजी महाराज 🚩
![]()

