इंग्रज आले होते आदेश देत… आज आठवणी घेऊन फिरतात
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
✍️ सचिन मयेकर
📅 शनिवार, २० डिसेंबर २०२५
मुंबईच्या समुद्रकिनारी उभा असलेला गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांचा दरवाजा नाही तर तो एका साम्राज्याच्या अहंकाराचा आणि एका राष्ट्राच्या स्वाभिमानाचा जिवंत पुरावा आहे अरबी समुद्राच्या लाटांसमोर उभा असलेला हा भव्य आकार आज शांत भासतो पण त्याच्या प्रत्येक रेषेत इतिहासाची धग आजही जाणवते

ब्रिटिश काळात मुंबई हे भारतातील सर्वात महत्त्वाचे बंदर होते इंग्लंडहून भारतात येणारे व्हाइसरॉय वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकारी जहाजाने याच ठिकाणी उतरत होते त्यामुळे भारतात पाऊल टाकताच सत्ता किती मोठी आहे हे दिसावे असा ब्रिटिशांचा उद्देश होता म्हणूनच समुद्राकडून येणाऱ्यांसाठी एक भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेतला गेला
सन 1911 मध्ये ब्रिटनचे सम्राट किंग जॉर्ज पंचम भारतात आले त्या भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया उभारण्याची घोषणा झाली पण हे केवळ स्मरण नव्हते हा ब्रिटिश साम्राज्याच्या ताकदीचा दगडी घोष होता भारतीय मनावर मानसिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी उभी केलेली ही रचना होती
या गेटचा आराखडा ब्रिटिश अभियंता जॉर्ज विटेट याने तयार केला इंडो सारासेनिक शैली वापरली गेली कारण इंग्रजांना हे समजले होते की भारतीय भूमीवर टिकायचे असेल तर भारतीय स्थापत्याचा आत्मा स्वीकारावा लागेल म्हणूनच हा गेट पूर्णपणे परकीय वाटत नाही तर तो भारतीय डोळ्यांना ओळखीचा भासतो
गेटवे ऑफ इंडिया कडे पाहताना अनेकांच्या मनात एक भावना जागी होते की ही रचना महाराष्ट्राच्या इतिहासातील उंच मनोऱ्यांची आठवण करून देते विशेषतः रायगड किल्ला येथील मानोरा जसा उंच डौलदार आणि सावध उभा आहे तशीच ही कमान समुद्राकडे पाहत उभी आहे ही नक्कल नाही तर रचनेच्या आत्म्याची छाया आहे
या गेटसाठी वापरलेले दगड मुंबई ठाणे परिसरातील खाणींमधून आणले गेले हजारो टन दगड आणि मजबूत बांधकाम वापरून सुमारे 26 मीटर उंच ही कमान उभी राहिली किती दगड वापरले गेले याची नेमकी मोजदाद इतिहास सांगत नाही पण त्या प्रत्येक दगडात ब्रिटिश सत्तेचा अहंकार ओतलेला होता
पण इतिहास नेहमी सत्तेच्या बाजूने चालत नाही ज्या गेटमधून ब्रिटिश सत्ता भारतात आली त्याच गेटमधून 1948 साली शेवटचे ब्रिटिश सैनिक भारत सोडून गेले जे दरवाजे वर्चस्वासाठी उघडले गेले तेच दरवाजे पराभवाचे साक्षीदार ठरले
आजही या परिसरात ब्रिटिश पर्यटक दिसतात ते सत्ता घेऊन येत नाहीत तर इतिहास पाहायला येतात कधी काळी ज्या गेटसमोर आदेश दिले जात होते आज त्याच गेटसमोर फोटो काढले जातात हाच काळाचा सर्वात मोठा बदल आहे
आज गेटवे ऑफ इंडिया ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक राहिलेले नाही तो त्यांच्या अस्ताचा पुरावा आहे तो भारतीय स्वातंत्र्याच्या विजयाची आठवण आहे सत्ता दगडांवर उभी राहू शकते पण टिकत नाही मात्र स्वाभिमान विचारांवर उभा राहतो आणि तोच कायम राहतो
रायगड आजही उभा आहे कारण तो दगडांचा नव्हे तर स्वराज्याच्या विचारांचा किल्ला आहे आणि गेटवे ऑफ इंडिया आजही उभा आहे कारण तो त्या विचारांसमोर पराभूत झालेल्या सत्तेचा मौन साक्षीदार आहे
![]()

