थेरोंडा आगलेचीवाडीतील युवकांनी दिले कासवांना जीवदान.

थेरोंडा आगळेचीवाडी बधाऱ्याजवळ आज दुपारी १२ वाजता स्थानिक युवक समुद्रावर फेरफटका मारायला गेले असता, समुद्रकिनारी खाडीलगत टाकलेल्या जाळ्यांमध्ये चक्क दोन मोठे कासव अडकलेले आढळले.
सचिन मयेकर- छावा – थेरोंडा- १९ ऑगस्ट २०२५
या घटनेची माहिती मिळताच सचिन बळी, सुशांत बळी, कुलदीप बळी, संजय जावसेन, महेश हाडके आणि सुधाकर हाडके या सहा युवकांनी तत्काळ धाव घेतली. जाळ्यात गुंतलेली कासवे तडफडत होती. मानवतेचा परिचय देत या तरुणांनी संयमाने जाळी सोडवून दोन्ही कासवांना वाचवले.
यानंतर त्यांनी ती कासवे परत थोड्या आत समुद्रात सोडून दिली. स्थानिक नागरिकांनी या तरुणांच्या संवेदनशीलतेचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील कासवे ही जैवविविधतेचा एक महत्त्वाचा भाग असून त्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचा संदेशही या घटनेतून अधोरेखित झाला.
युवकांच्या या कृतीमुळे समुद्रकिनाऱ्यावरचा “जीवदानाचा प्रसंग” ग्रामस्थांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.