घडून गेलं आता पुरे – रेवदंडा बाजारपेठ व गोळा स्टॉपजवळ गतिरोधकांची जोरदार मागणी

दिनांक : [ छावा – सचिन ०७ ऑगस्ट २०२५ छावा – सचिन मयेकर]
रेवदंडा गावातील मुख्य बाजारपेठेतील पारनाका ते आदर्श बँक परिसर, गोळा स्टॉप आणि रेवदंडा हायस्कूलजवळील मुख्य रस्ता या सर्व ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असूनही अद्याप पर्यंत योग्य त्या सुरक्षितता उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. परिणामी, या मार्गांवर वेगवान वाहने बेधडकपणे धावतात. विशेषतः एसटी बस आणि चारचाकी वाहनांचा वेग अनियंत्रित असतो, अशी तक्रार अनेक ग्रामस्थांनी ‘छावा’कडे नोंदवली.
आम्ही अपघात पाहिलाय, पुन्हा पाहायचा नाही!
सुमारे काही आठवड्यांपूर्वी गोळा स्टॉपजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर ग्रामस्थ अजूनही भयभीत आहेत. त्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आता नागरिकांनी याच ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या ठिकाणी लागलेत गतिरोधक हवेच!
ग्रामस्थांनी स्पष्टपणे खालील ठिकाणांसाठी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे:
पारनाका ते आदर्श बँक परिसरातील मुख्य रस्ता
गोळा स्टॉपजवळील एसटी थांबा परिसर
रेवदंडा हायस्कूल समोरील मुख्य रस्ता
वाढती शाळकरी मुलांची वर्दळ लक्षात घेता – शाळा सुटण्याच्या वेळेस नियंत्रण गरजेचे
स्थानीकांचे प्रशासनाला साकडे
रोज सकाळ-संध्याकाळी शाळकरी मुले, वृद्ध, महिला हे रस्त्यावरून चालत असतात. वाहनांचा वेग पाहता भविष्यात अजूनही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत स्थानिकांनी रेवदंडा ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिस प्रशासन यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
‘छावा’चे आवाहन:
वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग व वेगमर्यादा फलक ही केवळ सोय नसून, जनतेच्या जीविताचा हक्क आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने भूमिका घ्यावी, हीच अपेक्षा!