वटपौर्णिमा विरुद्ध पिंपळपौर्णिमा, भांडकुदळ बायको ७ जन्मी नकोच; पिंपळाला फेऱ्या मारत पुरुषांची प्रार्थना

छावा ; दि. ०९ जून | छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी वटपौर्णिमा विरुद्ध पिंपळपौर्णिमा, भांडकुदळ बायको ७ जन्मी नकोच; पिंपळाला फेऱ्या मारत पुरुषांची प्रार्थना
भांडकुदळ बायको सात जन्मी नको म्हणून पुरुषांकडून पिंपळाला ७ फेऱ्या मारत प्रार्थना करण्यात आली आहे. कायद्याचा दुरुपयोग करुन पतीला वेठीस धरणारी पत्नी नको अशी प्रार्थना असंख्य पुरुषांकडून करण्यात आली.
सुशील राऊत, छत्रपती सभाजीनगर : वटसावित्री पौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करून ७ जन्मी हाच पती लाभो यासाठी प्रार्थना करतात. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये वटसावित्री पौर्णिमेपूर्वी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली.पिंपळाला ७ फेरे मारून कायद्याचा दुरुपयोग करून पतीच्या कुटुंबाला वेठीस धरणारी, आयुष्य उध्वस्त करणारी पत्नी यापुढे नको अशी प्रार्थना केली.तसेच पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकतर्फी व्यवस्थेविरोधात साकडे घालण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्नीपीडित संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.याप्रकरणी पत्नीपीडित संघटनेचे संस्थापक भारत फुलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वटसावित्री पौर्णिमा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वटसावित्री पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाला ७ फेरे मारून सात जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करतात. मात्र आतापर्यंत अशा अनेक पुरुष आहेत त्यांच्या पत्नीने कायद्याचा दुरुपयोग करून त्यांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे. सरकारने महिला सबलीकरणासाठी कायदे तयार केले. मात्र याच कायद्याचा काही महिला दुरुपयोग करत आहेत. खोट्या गुन्ह्यांमध्ये पती व त्याच्या कुटुंबाला अडकवलं जात आहे. या गुन्ह्यांमध्ये खरं खोटं करण्याऐवजी पुरुषांना अडकवलं जातं. यात पती व त्याच्या कुटुंबाचा शारीरिक मानसिक छळ होतो.५ वर्षांपासून पिंपळ पौर्णिमा साजरी
पत्नी पिडीत पुरुष आश्रम ५ वर्षांपासून पिंपळ पौर्णिमा साजरी करतो.यातून समाज, शासनाचे लक्ष पुरुषांच्या समस्या,अन्यायाकडे वेधत आहे.ज्या पद्धतीने महिलांसाठी चळवळी झाल्या, तशाच पुरुषांसाठी सुद्धा गरज आहे. पुरुषांचा आवाज दबवण्याऐवजी त्यांना ऐकून घेणे, कायद्यात बदल घडवणे आणि सामाजिक मानसिकता सुधारणे यासाठी हे एक पाऊल ठरेल. “देव तरी आमचे म्हणणे ऐकेल,” या भावनेने पिंपळ वृक्षासमोर साकडे घालून पुरुषांच्या अश्रूंना आवाज देण्यात आला आहे अस अध्यक्ष अॅड. भारत फुलारे म्हणाले.
पुरुष हक्कांसाठी प्रमुख मागण्या
१. “पुरुष आयोग” ची तातडीने स्थापना करावी.
२. खोट्या तक्रारींविरोधात लिंग निरपेक्ष कायदेशीर कारवाई व शिक्षा व्हावी.
३. प्रत्येक जिल्ह्यात “पुरुष तक्रार निवारण केंद्र” सुरू करावे.
४. पोलीस ठाण्यांत “पुरुष दक्षता कक्ष” तयार करावा.
५. कौटुंबिक वादांचे प्रकरण एक वर्षात निकाली काढण्याचे बंधन असावे.