काशीद किनाऱ्यावर भीषण दुर्घटना! शिक्षक आणि विद्यार्थ्याचा लाटेत मृत्यू, एक विद्यार्थी थोडक्यात वाचला —अकोला हादरला, रायगड शोकमग्न
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी शनिवारी (८ नोव्हेंबर) दुपारी भयावह घटना घडली. अकोल्याहून शॉरवीन क्लासेसच्या सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर अचानक आलेल्या समुद्रलाटेने झडप घातली. क्षणात तीन जण पाण्यात ओढले गेले — त्यापैकी दोनांचा मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी थोडक्यात बचावला.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर — रविवार – ९ नोव्हेंबर २०२५
दुर्दैवी मृतांमध्ये —
राम विठ्ठल कुटे (वय ६०) — शिक्षक, उमरी वृंदावन नगर, उमरखेड, अकोला
आयुष रामटेके (वय १९) — विद्यार्थी, अकोला
तर आयुष बोबडे (वय १७) — विद्यार्थी, टी.टी.एम. कॉलेज, केशव नगर, अकोला हा स्थानिकांच्या धाडसामुळे वाचला असून त्याच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शॉरवीन क्लासेसचे १२ विद्यार्थी आणि ३ शिक्षक ५ नोव्हेंबर रोजी अकोल्याहून रायगड जिल्ह्याच्या सहलीसाठी रवाना झाले. ७ नोव्हेंबरला ते अलिबागला पोहोचले, आणि शनिवारी दुपारी काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले. काही विद्यार्थी व शिक्षक पोहण्यासाठी समुद्रात उतरले, मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेच लाटांच्या तडाख्यात सापडले.
स्थानिक नागरिकांनी शर्थीने मदतकार्य केले, परंतु दुर्दैवाने शिक्षक आणि विद्यार्थ्याचा जीव वाचवता आला नाही.
राम कुटे यांचा मृतदेह अलिबाग जिल्हा रुग्णालयात तर आयुष रामटेके याचा मृतदेह मुरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे अकोला आणि रायगड जिल्ह्यांत शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील दोन युवक अलिबाग किनाऱ्यावर बुडाले होते.
स्थानिक प्रशासनाने तातडीने सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश दिले असून पर्यटकांना समुद्रात खोलवर जाणे टाळण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

