शुक्रवार विशेष 🎬 छावा Filmfare प्रती मोहम्मद रफी म्हणून ओळख… आणि लता मंगेशकरांच्या आवाजात गाणी कोर्लईचे गायक योगेश भोसले

 

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर — १३ मार्च २०२६

मुरुड तालुक्यातील तालुक्यातील कोर्लई या छोट्याशा गावात राहणारा एक साधा रिक्षाचालक… पण जेव्हा तो मंचावर उभा राहतो तेव्हा त्याच्या आवाजात कधी महान गायक मोहम्मद रफी यांची छटा दिसते, तर कधी तो थेट लता मंगेशकर यांच्या सुरांची अनुभूती देतो. हा सुरेल प्रवास आहे योगेंद्र हरिचंद्र भोसले, म्हणजेच सर्वांना परिचित असलेल्या योगेश भोसले यांचा.

योगेश भोसले यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून लहानपणापासूनच त्यांना गाण्याची विशेष आवड होती. संगीताची ही ओढ त्यांच्या मनात अगदी लहान वयात निर्माण झाली. महान गायक मोहम्मद रफी यांच्या गाण्यांनी त्यांना विशेष प्रेरणा दिली. रफींची गाणी ऐकता ऐकता आणि गात गात ते स्वतःही त्या सुरांमध्ये रमू लागले. हळूहळू त्यांच्या आवाजात रफींची छटा जाणवू लागली आणि लोक त्यांना “प्रती मोहम्मद रफी” म्हणून ओळखू लागले.

योगेश यांच्या आयुष्यात संगीताची बीज त्यांच्या घरातूनच पडली. त्यांचे काका प्रकाश भोसले हे प्रसिद्ध भजनगायक होते. भजन स्पर्धांमध्ये ते पेटीवर थेट गाणी सादर करायचे आणि तिथेच गाणी रचायचे. लहानपणी योगेश त्या वातावरणात वाढले. संगीत, भजन आणि सुरांच्या त्या वातावरणामुळे त्यांच्या मनात गाण्याची आवड अधिक दृढ होत गेली.

लहानपणी रेवदंडा येथे होणाऱ्या संगीत कार्यक्रमांमध्ये जात असताना योगेश भोसले यांना लता मंगेशकर यांच्या आवाजाची विशेष आवड निर्माण झाली. “ए मेरे वतन के लोगो” या गाण्याचा त्यांनी खूप सराव केला. सराव करताना त्यांना जाणवलं की ते स्त्री आवाज देखील अचूक काढू शकतात. त्यानंतर त्यांनी लता मंगेशकर यांच्या अनेक गाण्यांचा अभ्यास केला आणि सातत्याने सराव करत आज ते मंचावर लता मंगेशकर यांच्या आवाजात गाणी सादर करू लागले.

आज जवळजवळ २५ वर्षांपासून योगेश भोसले गाणी गात आहेत आणि विविध कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करत आहेत. त्यापैकी गेल्या सहा वर्षांपासून ते लता मंगेशकर यांच्या आवाजात गाणी सादर करत आहेत, जे त्यांच्या कार्यक्रमांचे खास आकर्षण ठरले आहे.

संगीत ही त्यांची ओळख असली तरी उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा व्यवसाय करतात. दिवसभर रिक्षा चालवून संध्याकाळी ते सरावासाठी किंवा कार्यक्रमासाठी अलिबागला जातात. कधी कधी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करून ते परत घरी येतात. संगीतासाठी असलेली त्यांची जिद्द आणि मेहनत यामुळेच हा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.

योगेश भोसले यांच्यात आणखी एक कलागुण आहे. गणपती बनवण्याची कला त्यांना अवगत आहे. पूर्वी ते जवळजवळ १०० गणपती मूर्ती तयार करायचे, परंतु भावाच्या निधनानंतर त्यांनी हे काम कमी केले. आजही ते काही गणपती मूर्ती स्वतः तयार करतात.

त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक आठवण म्हणजे त्यांचे भाऊ जितेंद्र. त्यांनीच योगेश यांना स्टेजवर गाण्याची प्रेरणा दिली. मुंबईत राहून ते मोठमोठे कार्यक्रम पाहायचे आणि स्वतः पेटी वाजवायचे. एकदा त्यांनी योगेशला पेटीवर बसवून “हमें तुमसे प्यार कितना” हे गाणं शिकवलं. आजही योगेश कोणत्याही कार्यक्रमात हे गाणं गाताना आपल्या भावाची आठवण काढतात.

योगेश भोसले हे रेवदंडा गावचे जावई असून एकनाथ मांजरेकर यांचे मोठे जावई आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी वैशाली भोसले यांनीही खंबीर साथ दिली. कार्यक्रमांसाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर राहावे लागले, सरावासाठी वेळ द्यावा लागला तरी त्यांनी कधी अडथळा आणला नाही. उलट त्यांच्या कलेला प्रोत्साहन देत नेहमीच पाठबळ दिले. त्यामुळेच योगेश भोसले यांना आपल्या कलेचा प्रवास आत्मविश्वासाने पुढे नेता आला.

आजही कोर्लईच्या रस्त्यावर रिक्षा चालवणारा हा कलाकार जेव्हा मंचावर उभा राहतो, तेव्हा त्याच्या आवाजात कधी प्रती मोहम्मद रफी, तर कधी लता मंगेशकरांच्या सुरांची जादू ऐकू येते. साध्या आयुष्यातून उभा राहिलेला हा कलाकार आज आपल्या सुरांनी लोकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *