⚡ “रस्ता की रणांगण? अलिबागच्या रस्त्यावर दररोजचा जीवघेणा प्रवास!”
अलिबाग – बेलकडे ते अलिबाग हा रस्ता म्हणजे आता रस्ता म्हणून ओळखणंही कठीण झालं आहे. उखडलेला रस्ता, खोलवर गेलेले खड्डे आणि त्यात साचलेलं पाणी यामुळे हा मार्ग रस्ता म्हणावा की एखादा ओसाड रानवाटा, हेच ओळखता येत नाही.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा रविवार – ०५ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही महिन्यांत या मार्गाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की रोज प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांसाठी तो अक्षरशः “आट्या-पाट्यांचा खेळ” बनला आहे. प्रत्येक वळणावर धक्का, प्रत्येक खड्ड्यानंतर तोल जाण्याचा धोका — वाहनं डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे झोके घेत जातात, जणू काही रस्त्यावर नव्हे तर खेळाच्या मैदानावर प्रवास सुरू आहे.
या उखडलेल्या रस्त्याला “रस्ता” ही उपमा देणंही आता शक्य नाही. कारण इथे रस्ता नाही, तर उखडलेला राग, दुर्लक्ष आणि प्रशासनाची बेफिकिरी यांचं मिश्रण पसरलं आहे. लोकांना आता प्रवास करताना “आज अपघात होतोय की उद्या” अशी भीती वाटू लागली आहे.
पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी भीषण होते पाण्यात दडलेले खड्डे वाहनचालकांसाठी सापळे ठरतात. काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा या मार्गावर अपघात झाला; सुदैवाने ती वाचली, पण जखमी झाली. अशा घटना आता रोजच्याच झाल्या आहेत.
ग्रामस्थांचा सवाल थेट आणि जळजळीत आहे “कोणी रस्ता देतो का रस्ता?”
लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग गप्प आहेत, पण जनतेचा संयम आता संपत चाललाय.
उखडलेला रस्ता हा आता प्रशासनाच्या चेहऱ्यावरचा आरसाच बनला आहे जो त्यांच्या निष्क्रियतेचा पुरावा देतो.
![]()

