९०व्या वर्षीही सेवेची अखंड ज्योत — डॉक्टर सुरेश गोरेगावकर यांच्या हस्ते रेवदंडा मारुती आळी शाळेत ध्वजारोहण

दिनांक : १५ ऑगस्ट २०२५

रेवदंडा – सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल

रेवदंडा मारुती आळी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आज स्वातंत्र्यदिनाचा ध्वज एका अनोख्या मान्यवराच्या हस्ते फडकला. रेवदंडातील ज्येष्ठ वैद्यकीय सेवेतील दीपस्तंभ, डॉ. सुरेश शांताराम गोरेगावकर वयाच्या तब्बल ९० व्या वर्षीही रुग्णसेवा सुरू ठेवणारे  यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान मिळाला.

 

डॉ. गोरेगावकर हे केवळ डॉक्टर नाहीत, तर रुग्णांच्या वेदना कमी करणारे खरे जीवनदाते आहेत. त्यांच्या औषधांनी मिळणारा दिलासा, आणि त्यांनी दिलेला हुरूप, आजही गावातील प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. वयाच्या या टप्प्यावरही ते आपल्या दवाखान्यात हजर राहून, गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात हीच त्यांची खरी देशसेवा.

आज या कार्याचा गौरव करण्यासाठी, त्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. ध्वजवंदनानंतर बोलताना, डॉ. गोरेगावकर यांनी भावुक होत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले, मी आजवर औषधांनी शरीर बरे केले, पण या ध्वजारोहणाच्या मानाने माझं मन बरे झालं.

गावकऱ्यांसाठी हे दृश्य अविस्मरणीय ठरले  जिथे देशसेवेचा ध्वज आणि आरोग्यसेवेचा ध्वज, दोन्ही एकत्र फडकताना दिसले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *