१५ जानेवारी — रणशूरांचा दिवस! भारताच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि बलिदानाचा रणघोष
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 गुरुवार , १५ जानेवारी २६
आजचा दिवस साधा नाही कारण आज १५ जानेवारी आहे आणि हा दिवस देशासाठी छाती पुढे करून उभ्या असलेल्या रणशूरांचा सन्मानदिन म्हणून ओळखला जातो तसेच आज भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात हा एक सुवर्णक्षण ठरला कारण १९४९ साली ब्रिटिश सत्तेच्या सावटातून बाहेर पडलेल्या भारतात प्रथमच पूर्णतः भारतीय नेतृत्वाखाली सैन्य उभे राहिले आणि फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला, ज्यामुळे भारतीय सैन्य केवळ एक फौज न राहता भारताची ढाल, भारताची तलवार आणि भारताचा आत्मा बनले.
सीमेवर उभा असलेला जवान झोप न घेता थंडी, ऊन, पाऊस, गोळ्या आणि बॉम्ब यांची पर्वा न करता सज्ज उभा असतो कारण त्याच्या मागे उभा असतो भारत आणि भारतासाठी मरायची तयारी ठेवणे हाच खऱ्या देशभक्तीचा अर्थ मानला जातो. आपण आज सुरक्षित आहोत कारण कुणीतरी अंधारात जागा आहे, आपण सुखात आहोत कारण कुणीतरी रणांगणात उभा आहे आणि आपण मोकळा श्वास घेतोय कारण कुणीतरी आपले प्राण देशासाठी अर्पण करण्यास सदैव तयार आहे.
आजच विकिपीडिया दिनही साजरा केला जातो आणि मुक्त ज्ञान, सत्य व माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी हा त्यामागचा उद्देश आहे, त्यामुळे एकीकडे सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान तर दुसरीकडे ज्ञानाच्या सीमेवर अज्ञानाशी लढणारे शब्दसैनिक असे दोन्हीही भारताच्या ताकदीचे प्रतीक ठरतात. त्यामुळे १५ जानेवारी हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नसून रक्त, घाम आणि बलिदानाने लिहिलेला इतिहास आहे आणि भारताच्या मातीसाठी जगणाऱ्या व मरणाऱ्या वीरांचा हा गौरवदिन आहे.
सलाम त्या प्रत्येक जवानाला जो नावाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता फक्त देश सुरक्षित राहावा हीच एकमेव इच्छा मनात ठेवून आपले कर्तव्य बजावत असतो आणि म्हणूनच प्रत्येक भारतीयाच्या मनातून आज एकच आवाज उमटतो—जय हिंद, जय जवान.
![]()

