ह्युंदाई मोटरचा स्तुत्य उपक्रम

गडचिरोलीच्या दुर्गम शाळांमध्ये ‘Project H₂OPE’ अंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी

छावा| गोंदिया, ९ जून | वृत्तसंस्था 

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा ‘Project H₂OPE’ हा उपक्रम राबवण्यात आला असून, याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले आहे.

गडचिरोली जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून, येथे पायाभूत सुविधा अद्यापही मर्यादित आहेत. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याची सुविधा मिळावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने Project H₂OPE अंतर्गत 250 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभ्या केल्या आहेत.

या उपक्रमाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 100 शाळा, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 150 शाळा समाविष्ट करण्यात आल्या. विशेषतः अहेरी (35 शाळा), भामरागड (14), धानोरा (32), एटापल्ली (39), कोरची (14) आणि मुलचेरा (16) या तालुक्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात प्रकल्प राबवण्यात आला. या माध्यमातून 26,341 विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) युनिट्स, जलशीतक यंत्रणा, सबमर्सिबल पंप, बोअरवेल्स, तसेच सहा थरांची जलसाठवणूक टाकी बसवण्यात आली आहे. याशिवाय जलसंवर्धन व स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले.

5.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करत ह्युंदाईने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली असून, हा उपक्रम CSV (Creating Shared Value) धोरणांतर्गत राबवण्यात आला आहे. शिक्षण व आरोग्याच्या क्षेत्रात होणारी ही गुंतवणूक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असून, शाश्वत व समावेशक विकासासाठी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत सुरक्षित पाणी पोहोचवण्यासाठी कंपनीने उचललेले हे पाऊल इतर कंपन्यांसाठीही प्रेरणादायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *