होळी-धुळवडीसाठी कडक इशारा आगावगिरी दारूधुंद गोंधळ व नियमभंग केल्यास थेट गुन्हे दाखल

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर सोमवार ०२ मार्च २०२६

होळी व धुळवड सण शांततेत आणि सलोख्याने पार पडावा यासाठी विशेष सुरक्षा सभा घेण्यात आली. सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संयम राखावा आणि कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले. या वेळी रेवदंडा पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी सपोनि बी. के. जाधव यांनी ठाम इशारा दिला. सभेस सरपंच प्रफुल्ल मोरे, उपसरपंच मंदा बळी, ग्रामपंचायत सदस्य आशा कमळनाखवा, बबिता खंडेराव, सागरी सुरक्षा दलाचे सुहास घोणे तसेच गोरक्षनाथ नवरीकर, ज्ञानेश्वर टिवळेकर, गजानन झेंडेकर, ताराचंद कोंडे, शरद खंडेराव, नंदन, दिपक पवार उपस्थित होते. तसेच पोलीस सुग्रीव गव्हाणे, पोलीस सिद्धेश शिंदे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सणात राजकारण नको

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे घराघरांत राजकीय मतभेद पोहोचले असले तरी सणाच्या निमित्ताने जुने वाद उकरून काढू नयेत. जमिनीचे वाद, नारळाच्या झाडांवरील किरकोळ तंटे किंवा वैमनस्य वाढविण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सपोनि बी. के. जाधव यांनी सांगितले.

भांडण सांगून होत नाही – सतर्क राहा

सपोनि बी. के. जाधव यांनी महत्वाचा मुद्दा मांडताना सांगितले की, “निवडणुकांच्या वेळी देखील अनेक जण ‘काही होणार नाही’ असे म्हणत होते; मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी वाद झाले. त्यामुळे ‘भांडण होणार नाही’ असे गृहित धरून निष्काळजी राहू नका. भांडण कधी आणि कुठून सुरू होईल हे सांगता येत नाही.” प्रत्येकाने स्वतः संयम बाळगणे, छोट्या कारणावरून वाद वाढू न देणे आणि परिस्थिती बिघडत असल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दारू पाजून भांडण लावणाऱ्यांवर कडक कारवाई

जाणीवपूर्वक दारू किंवा नशा पाजून भांडण घडवून आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील. आवश्यक असल्यास तडीपारीची प्रक्रिया राबविण्यात येईल.भांडण झाल्यास संबंधितांना वैद्यकीय तपासणी करून तत्काळ कारवाई केली जाईल  कोणतीही शिफारस मान्य केली जाणार नाही.

डीजे १० नंतर वाजला तर ₹१ लाख दंड

सरकारी नियमानुसार रात्री १० नंतर डीजे किंवा बेंजो वाजविण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास किमान ₹१ लाख दंड आणि साहित्य जप्त करण्यात येईल. लग्नघरांनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असा इशारा देण्यात आला.

धार्मिक सलोखा अबाधित ठेवा

कोणत्याही धार्मिक स्थळाजवळ रंगफेक, हुल्लडबाजी किंवा भावना दुखावणारे कृत्य केल्यास कठोर गुन्हे दाखल करण्यात येतील. सणाचा आनंद सर्वांनी शांततेत साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

सागर सुरक्षा व सतर्कता

सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार सोसायटी व सुरक्षा रक्षकांनी किनारपट्टी भागात विशेष दक्षता ठेवावी. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

भांडण केल्यास कडक कलमांखाली गुन्हे

सपोनि बी. के. जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला की, दारू पिऊन किंवा कोणत्याही कारणाने भांडण, मारामारी किंवा आगावगिरी करणाऱ्यांवर कडक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येतील. गुन्हा नोंद झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे राबवली जाईल. अशा प्रकरणांमध्ये कोणाचीही शिफारस, दबाव किंवा मध्यस्थी मान्य केली जाणार नाही.

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये संबंधितांना सहज सुटका मिळणार नाही, याची जाणीव ठेवावी. त्यामुळे सणाच्या आनंदात कायद्याचे उल्लंघन करू नये, असा इशाराही त्यांनी दिला

होळी हा आनंदाचा आणि एकोप्याचा सण आहे; वैर काढण्याचा दिवस नाही. क्षणिक रागातून घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्यभराचा पश्चात्ताप ठरू शकतो. त्यामुळे संयम, शिस्त आणि कायद्याचे पालन करून सण साजरा करावा, असे सपोनि बी. के. जाधव यांनी आवाहन केले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *