हरवलेला वॉलेट… पण गावकऱ्यांच्या प्रामाणिकपणाने सुरक्षित परत

गावकऱ्यांच्या प्रामाणिक कृतीमुळे हरवलेला वॉलेट सुरक्षित परत मिळाला; यात महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रेस कार्ड्स असल्यामुळे मिळाला दिलासा.
रेवदंडा प्रतिनिधी | ७ सप्टेंबर २०२५
आज सकाळी घडलेली एक घटना रेवदंडा गावात प्रामाणिकतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण ठरली आहे.
पत्रकार सचिन मधुकर मयेकर सकाळी आपल्या टू-व्हिलरवरून नारायण आळी मार्गे जात असताना त्यांच्या खिशातून वॉलेट खाली पडला. या वॉलेटमध्ये १४३० रुपये रोख रक्कम, पॅन कार्ड, बँकांची एटीएम कार्ड्स तसेच सर्व प्रेस कार्ड्स यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे होती.
दरम्यान, कोरलई येथील योगेश भोसले यांच्या निदर्शनास आले की नारायण अळी येथील विहिरीजवळ वॉलेट पडलेला आहे. त्यांनी तो उचलला आणि कलावती आई मंदिरात सत्संगाला गेल्यावर तो वॉलेट आशिष वासुदेव यांच्याकडे सुपूर्द केला. वॉलेटमध्ये प्रेस कार्ड असल्यामुळे हा वॉलेट पत्रकार सचिन मधुकर मयेकर यांचा असल्याचे लगेच ओळख पटली.
यानंतर आशिष वासुदेव यांनी रेवदंडा ग्रामपंचायतीचे सदस्य सुराराम माळी यांच्याशी संपर्क साधला. सुराराम माळी यांनी तातडीने सचिन मयेकर यांना फोन करून बाजारपेठेतील त्यांच्या दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर वॉलेट सचिन मधुकर मयेकर यांच्या स्वाधीन करण्यात आला.
या प्रामाणिक कृतीबद्दल पत्रकार सचिन मधुकर मयेकर यांनी योगेश भोसले, आशिष वासुदेव आणि सुराराम माळी या तिघांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
ही घटना रेवदंड्यातील लोकांमध्ये असलेली आपुलकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक विश्वास दाखवणारी ठरली आहे.