छावा विशेष स्वच्छतेतून समाजजागृती घडवणारे संत — संत गाडगेबाबा
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर — शनिवार —२० डिसेंबर २०२५
संत गाडगेबाबा हे केवळ संत नव्हते, तर समाजाच्या जखमांवर औषध लावणारे जिवंत आंदोलन होते. हातात काठी, खांद्यावर झोळी आणि मनात केवळ समाजभान अशी त्यांची ओळख. त्यांनी देवळांच्या घंटांपेक्षा माणसांच्या दु:खाला महत्त्व दिलं आणि पूजा-अर्चेपेक्षा स्वच्छतेला अग्रक्रम दिला.गावात प्रवेश करताच गाडगेबाबा सर्वप्रथम झाडू हाती घेत. रस्ते, देवळांची आवारे, सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करत. ही केवळ साफसफाई नव्हती, तर समाजाच्या मनात साचलेली अस्वच्छता, अज्ञान आणि अंधश्रद्धा झाडून टाकण्याची प्रक्रिया होती.स्वच्छता हीच खरी देवपूजा हा त्यांचा विचार आजही तितकाच जिवंत आहे.गाडगेबाबांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केलं. त्यांच्या अभंगांमधून देवाच्या नावाने चालणारा ढोंगीपणा, जातिभेद, दारिद्र्य आणि अंधश्रद्धांवर त्यांनी नेमका प्रहार केला. मंदिरात देव शोधण्यापेक्षा भुकेल्याला अन्न देणं, रुग्णाची सेवा करणं आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणं हाच खरा धर्म असल्याचं त्यांनी ठामपणे मांडलं.दानातून उभ्या राहिलेल्या निधीतून त्यांनी धर्मशाळा, शिक्षणसंस्था आणि रुग्णसेवा सुरू केली. स्वतःसाठी कधीच काही साठवलं नाही; जे मिळालं ते समाजासाठी दिलं. त्यामुळेच गाडगेबाबा हे समाजसुधारक ठरले.आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वंदन करताना, केवळ हार-फुले अर्पण करून थांबणं पुरेसं नाही. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, अंधश्रद्धेला विरोध करणं, गरजूंसाठी हात पुढे करणं हाच गाडगेबाबांना खरा अभिवादनाचा मार्ग आहे.झाडू हातात घेतलेला हा संत आजही आपल्याला एकच प्रश्न विचारतो आपण समाज स्वच्छ करण्यासाठी नेमकं काय करत आहोत?
![]()

