साळाव – रोहा मार्गावरील प्रवास बनला धोकादायक
- रस्ता रुंदीकरण ठरतेय प्रवाशांसह स्थानिकांच्याही डोकेदुखीचे कारण

अलिबाग (विशेष प्रतिनिधी, दि. ०५ जून) – मुरूड – रोहा तालुक्यातील महत्वाचा प्रवास मार्ग असणारा साळाव – रोहा मार्गावरील प्रवास स्थानिक तसेच प्रवासी यांच्यासाठी धोकादायक बनला असून, दिवसेंदिवस तो अधिक असुरक्षित होत असल्याचा आक्रोश जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम आता स्थानिकांसह प्रवासांना डोकेदुखीचे सिद्ध होत असले तरी, या कामाच्याबाबतही नेहमीप्रमाणे बांधकाम विभाग कासवाच्या गतीने कार्यरत असल्याचे आढळत येत आहे.
रस्ता रुंदीकरण ही बाब कोणत्याही परिसराच्या विभागासाठी महत्वाची आहे. पण या विकासकामाची दिशा योग्य नसेल तर तरतुदीपेक्षा जास्त खर्च, त्रास, वित्त तसेच जीवित हानी आणि जनआक्रोश अशा भयंकर घटना घडायला वेळ लागत नाही. आणि अशीच काहीशी स्थिती सद्य:घडीला साळाव – रोहा मार्गाच्या रस्ता रुंदीकरण कामाच्या संदर्भात उभी राहिल्याचे आढळून येत आहे. गेले ०५ महिने या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी साळाव पासून तळेखार पर्यंत खोदकाम करण्यात आले असून, दरम्यान कोणत्याही प्रकारचे बांधकाम अद्याप करण्यात आले नाही.

कोकणात ऋतुकालाआधीच पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडालीच आहे. शिवाय या पावसामुळे किंवा सततच्या मुसळधार पावसाच्या स्थितीमुळे पारंपरिक खड्डे जागोजागी डोके वर काढू लागले आहेत. त्यात भरीस भर म्हणजे या खोदलेल्या मार्गावर पावसाचे पाणी साठून राहत आहे. त्यामुळे काही वेळाने हा कच्चा रस्ता चिखरलमय होऊन त्यावरून पायी किंवा वाहनाने प्रवास करणे त्रासदायक शिवाय धोक्याचे ठरत आहे. जागोजागी केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी जमलेल्या पाण्यामुळे नेमका अंदाज येत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत किंवा मोठ्या प्रमाणात अपघात घडण्याचा संभाव्य धोका संबंधित परिसरात निर्माण झाला आहे. त्यातही रात्रीच्या वेळेत अनेक प्रवासी जीव मुठीत ठेवून प्रवास करीत आहेत.
ठेकेदारामुळे प्रवाशांचा जीव रामभरोसे
- मिठेखार ग्रामपंचायतीकडून बांधकाम विभागाला निवेदन

मुरूड (वार्ताहर, दि. ०५ जून) साळाव – रोहा रस्ता रुंदीकरण कामाचा एक भाग म्हणून जागोजागी खोदकाम सुरू आहे. पण यामध्ये नियोजनाचा अभाव जाणवत आहे. कारण रस्त्याच्या कडेलगत असणारी महाकाय वृक्षांची मुळे उघडी पडल्यामुळे आगामी काळात किंवा वादळी सदृश्य पावसात ही झाडे उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदारांला वेळोवेळी सावध करूनसुद्धा ठेकेदाराने कान्हाडोळा केला असल्याने अखेर, याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शिवाय कामकाजात जातीने लक्ष घालण्यासाठी मिठेखार ग्रामपंचायतीकडून बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
• दैनंदिन जीवनात बिर्ला मंदिर परिसराचे महत्व
पर्यटनाच्या दृष्टीने जेएसडब्ल्यू व्यवस्थापनाअंतर्गत असलेले बिर्ला मंदिर स्थानिकांच्या रोजगाराचे एक साधन आहे. शिवाय याठिकाणी स्थानिक गरजा आणि अत्यावश्यक साधन सामुग्री उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लघु पातळीवर व्यापार उद्दिम केंद्रित झाला आहे. तसेच या परिसरात वाटिका कॉलनी येथे स्टेट बँक, शाळा तर नजीकच्या परिसरात मेडिकल, दवाखाने, आधार सेवा केंद्र आदी आवश्यक सुविधा स्थाने उपलब्ध आहेत. शिवाय रोहा येथील शासकीय आणि खाजगी कार्यालये, कंपनी येथे म्हणून कर्मचारी कार्यरत असणारे चौल – रेवदंडा पंचक्रोश आणि मुरूड तालुक्यातील नागरिक, रोहा तालुक्यातील विविध शिक्षण संस्थामध्ये प्रवेशित विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी हा मार्ग महत्वाचा आहे.
• प्रवासासाठी खिशावर अधिकचा भार
ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्य विविध कारणांमुळे हा मार्ग महत्वाचा आहे. मात्र अवजड वाहनांद्वारे वाहतूक शक्य नसल्याने गोरगरीबांना महागाईच्या काळात दिलासा देणारी लालपरीची सुविधा तात्पुरता बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवासासाठी अन्य वाहतूक साधनांचा वापर करणे अपरिहार्य झाले असून, त्याचा ताण सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होऊ लागला आहे.
“ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने रस्त्यांचा विकास आवश्यक आहे. पण हा विकास स्थानिकांना त्रासदायक ठरत असेल तर विकासकामात नियोजनबद्धतेचा अभाव आहे, असे सिद्ध होते. तेव्हा प्रशासनाला विनंती आहे की, संबंधित विभागाने या कामाकडे जातीने लक्ष द्यावे.” : – यज्ञेश पाटील, मिठेखार ग्रामस्थ तथा युवा सामाजिक कार्यकर्ते
बिर्ला येथे लहान मुलांची शाळा आहे. आमच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं, या हेतूने आम्ही येथे प्रवेश घेतला. मात्र आता शाळेत येण्यासाठी जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागणार आहे. :- पालक तथा ग्रामस्थ, रेवदंडा