आक्षी —साखर परिसरात वनविभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न; नागरिकांनी सहकार्य करावे — वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील
आक्षी –साखर वरून थेट छावा LIVE रिपोर्टिंग
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —आक्षी —साखर रविवार १४ डिसेंबर २०२५
नागाव–साखर व परिसरात बिबट्याच्या वावराबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभाग अलिबाग कडून अत्यंत नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि संवेदनशील पद्धतीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग मा. नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

साखर कोळीवाडा व साखर खाडी परिसर हा दाट तिवर–मँग्रोव्ह जंगल, दलदल आणि नैसर्गिक आडोसे असलेला असल्याने बिबट्याचा अचूक ठावठिकाणा शोधणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे. तरीदेखील वनविभाग कोणतीही कसूर न ठेवता २४ तास गस्त, शोधमोहीम व निरीक्षण करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या मोहिमेसाठी वनविभाग, पुणे येथील प्रशिक्षित रेस्क्यू टीम, मँग्रोव्ह स्टाफ, अतिक्रमण निर्मूलन पथक तसेच स्थानिक यंत्रणा यांचा समन्वयाने सहभाग असून थर्मल ड्रोन, कॅमेरा ट्रॅप, पगमार्क तपासणी यांसारखी आधुनिक साधने वापरून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. मात्र, नैसर्गिक झाडीची घनता आणि खाडी परिसरामुळे ड्रोनद्वारेही अचूक निरीक्षणास मर्यादा येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, साखर, नागाव व लगतच्या वाड्यांमध्ये वनविभागाकडून जनजागृती, काउन्सेलिंग व प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला असून नागरिकांना घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती, हालचाल किंवा दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणताही फोन, संदेश किंवा माहिती मिळताच आमचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचून शहानिशा करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित व्हिडिओ, मेसेज किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. चुकीच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होते व शोधमोहीमेत अडथळे येऊ शकतात,असे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

बिबट्याच्या स्वभावाविषयी माहिती देताना त्यांनी नमूद केले की, बिबट्या हा स्वभावतः लाजाळू प्राणी असून माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. त्याला चिथावणी दिली नाही, गर्दी केली नाही व शांतता राखली, तर तो स्वतःहून त्या परिसरातून निघून जाण्याची शक्यता अधिक असते.
सध्या साखर कोळीवाडा परिसरात चार पिंजरे लावण्यात आले असून बकरी व कोंबडी ठेवून आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, खाडी परिसरात मासे, खेकडे यांसारखे नैसर्गिक अन्न सहज उपलब्ध असल्याने बिबट्या पिंजऱ्यांकडे न वळण्याची शक्यता देखील अभ्यासली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
वनविभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे. वनविभाग आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत आहे,असा विश्वासार्ह संदेश देत नरेंद्र पाटील यांनी स्थानिक नागरिक व पर्यटकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
![]()

