सर्वे डोंगराचा ढस धोकादायक _ अपघाताची शक्यता

छावा, दि. २५ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी
वेळप्रसंगी दगड-माती रस्त्यावर येऊन अपघाताची शक्यता ?
* संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची मागणी
मे महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस,जून महिन्यात वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसाने अलिबाग-मुरुड रस्त्यावर दांडा ते सर्वे दरम्यान रस्त्यावर फणसाड अभयारण्य क्षेत्रात असलेल्या सर्वे डोंगराचा ढस ढासळून वेळप्रसंगी रस्त्यावर माती-दगड येऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.
मागील काही वर्षापूर्वी सर्वे डोंगराचा ढस ढासळून माती व मोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. फणसाड वन्यजीव अभयारण्य व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सर्वे डोगराचा काही भाग उतरवून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तीन जुलै २०२० रोजी झालेले निसर्ग चक्रीवादळ तसेच मागील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वादळी पावसानंतर पुन्हा सर्वे डोगराचा ढस ढासळून माती दगड खाली आले होते. वेळ प्रसंगी जुलै महिन्यात काही दिवस पावसाचा जोर राहिल्यास, मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यास या डोंगराचा ढस ढासळून माती व दगड रस्त्यावर येण्याची व वाहतुकीवर परिणाम होण्याची तसेच वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी यात लोकप्रतिनिधी,फणसाड अभयारण्य व संबंधित बांधकाम खात्याच्या अधिका-यांनी पाहाणी करून उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.
दरम्यान, मागील वर्षी साळाव – मुरुड रस्त्यावर बारशिव येथे संरक्षक भिंत बांधण्यात आली, मात्र याच रस्त्यावर सर्वे डोंगराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्सम उपाययोजना करण्यात दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
________________________________________