सर्वांच्या आठवणीत – बाबू – माणुसकीचं चाक फिरवत गेलेला माणूस

छावा रेवदंडा | १३ जुलै २०२५ (सचिन मयेकर)
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा आवाज आजही येतो, कामं सुरू आहेत, पण एक गोष्ट कायमची हरवली आहे – बाबू.
सचिन उर्फ बाबू झावरे यांचं निधन होऊन सुमारे सात महिने होत आलेत. पण त्यांच्या कार्याची आठवण, त्यांच्या माणसांशी असलेल्या नात्याची उब, अजूनही गावात प्रत्येक वळणावर अनुभवायला मिळते. बाबू हे नाव केवळ एका गाडीचालकाचं नव्हतं; ते एक विश्वासाचं, आपुलकीचं आणि माणुसकीचं प्रतीक होतं.
बाबूंचं व्यक्तिमत्त्व फार साधं, पण तितकंच प्रभावी होतं. ते नेहमीच सौम्य भाषेत बोलायचे, अहो-जाहो करत समोरच्याला मान देत. वेळेचं भान, कामात शिस्त, आणि कोणत्याही कारणास्तव थांबून न बसण्याचा त्यांचा स्वभाव हे त्यांचं कार्यनिष्ठेचं मूर्त रूप होतं. त्यांनी कधीही आपल्या कामात त्रुटी येऊ दिली नाही.
बाबूंचं स्त्रियांविषयीचं भानही विशेष उल्लेखनीय होतं. एखादी महिला कचऱ्याचा डबा घेऊन येताना दिसली, तर ते झटकन खाली उतरून स्वतः डबा गाडीत ठेवत. महिलेला उचलायला लावायचं नाही, हा त्यांच्या मनातल्या आदरभावाचा अलिखित नियमच होता. म्हणूनच अनेक महिला आजही बाबूंची आठवण मोठ्या प्रेमाने आणि आदराने करतात.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात, जेव्हा सारा गाव भीतीच्या सावटाखाली होता, बाबू मात्र आपल्या घंटागाडीच्या जबाबदारीवर ठाम राहिले. त्यांनी रस्त्यावर, कंटेन्मेंट झोनमध्ये, पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरातसुद्धा जीवाची पर्वा न करता काम सुरू ठेवले. केमिकल फवारणीसाठी गाडी घेऊन जाणं, प्रत्यक्ष सहभागी होणं हे सगळं ते निर्विकारपणे करत राहिले. ही केवळ नोकरी नव्हती, ती त्यांची सेवा होती.
त्यांची प्रामाणिकता देखील प्रेरणादायी होती. पगार मिळताना गाडी बंद असलेल्या दिवसांचं स्वतःहून खाडं दाखवणं आजच्या काळात विरळा गुण आहे.
त्यांचं काम हे फक्त एका घंटागाडीपुरतं मर्यादित नव्हतं; ती एक सामाजिक जबाबदारी, एक आंतरिक निष्ठा होती. गाडी बंद तर घर बसायचं नाही, कार्यालयात हजेरी द्यायची हाच त्यांचा नियम होता.
बाबू आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं चाक आजही आपल्या मनात फिरतं आहे. आजही घंटागाडी येते, कामं होतात, पण लोकांच्या ओठांवर एकच वाक्य असतं –बाबू सारखा माणूस पुन्हा भेटला नाही.
रेवदंडा ग्रामपंचायतसाठी आणि ग्रामस्थांसाठी बाबू हे केवळ नाव नव्हतं, ते एक भावनिक नातं होतं. त्या नात्याला आजही गाव जपून ठेवतोय – आठवणीत, मनात, आणि श्रद्धांजलीत.
– भावपूर्ण श्रद्धांजली, एक कर्मनिष्ठ, प्रेमळ आणि माणुसकीचा चेहरा हरवलेला गाव.