सर्वपित्री अमावस्या विस्मरणात गेलेली नाळ

आजच्या धकाधकीच्या जगात माणसाकडे स्वतःच्या कुटुंबाला वेळ नाही, मग पूर्वजांना तो कुठून देणार? पैशाच्या मागे धावता-धावता, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवून जाताना आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या पूर्वजांची आठवण हळूहळू क्षीण होत चालली आहे.

संपादकीय ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. २१ सप्टेंबर २०२५

सर्वपित्री अमावस्या हा दिवस म्हणजे केवळ पितरांना ताटभर अन्न देण्याचा सोहळा नाही. हा दिवस म्हणजे आपण कोण आहोत, आपल्या अंगी असलेल्या संस्कारांची मुळे कुठे आहेत, आणि आपण आजवर कोणाच्या आधारावर उभे आहोत याची आठवण करून देणारा क्षण आहे.

आजच्या पिढीला यासाठी वेळ नाही असं आपण म्हणतो. खरं तर वेळ नसेल असं नाही  हा प्राथमिकतेचा प्रश्न आहे.

👉 एखादा तास Netflix कमी पाहिला,

👉 WhatsApp वरच्या फालतू फॉरवर्ड मेसेजेस न वाचले,

👉 Facebook–Instagram वरची अखंड रील्स स्क्रोल करणं थोडं कमी केलं,

तर त्या वेळेत आपण आपल्या पूर्वजांना स्मरण करू शकतो.

पूर्वजांना अन्न अर्पण करणं म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती देणं एवढंच नाही, तर आपण स्वतःला त्यांच्या उपकारांची आठवण करून देणं आहे. आपण खातो तो पहिला घास, आपण उभारलेलं घर, आपण मिळवलेलं शिक्षण  या सगळ्याच्या पायाभूत रचनेत आपले पूर्वज सामावलेले आहेत.

आज जर आपण त्यांना विसरलो, तर उद्या आपली पुढची पिढी आपल्यालाही विसरेल.

सर्वपित्री अमावस्येला दिवा लावणं, पितरांना ताट वाढणं, ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर कृतज्ञतेचा उत्सव आहे. या दिवशी आपण त्यांच्या आठवणी हृदयात जपल्या, तर ते खरे स्मरण ठरेल.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *