संपादकीय – समुद्रातून घातपाताचा कट? – रायगड पोलिसांचा दक्षतेचा विजय”

छावा, संपादकीय | दि. १२ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा)
रेवदंडा किनाऱ्यावर अलीकडेच सापडलेली ‘पाकिस्तानची बोट’ ही केवळ चुकून भरकटलेली नौका नव्हती. तिच्यावर आढळलेली GPS मशीन, सिग्नल उपकरणं आणि सागरी वाटचालीसाठी वापरली जाणारी यंत्रणा पाहता, हे स्पष्ट होते की ही बोट माहिती संकलन, संभाव्य घातपात किंवा सागरी टेहळणी यासाठी वापरण्यात येत होती. भारताच्या सागरी सुरक्षेला हे एक मोठं आव्हान ठरणारं होतं, पण ते रायगड पोलिसांच्या दक्षतेमुळे यशस्वीरित्या उधळून लावलं गेलं.
रायगडचे पोलिस अधीक्षक मा. आचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली रेवदंडा पोलिस स्टेशन, BDDS पथक, आणि सागर रक्षक दल यांनी संयुक्तपणे आणि तात्काळपणे कारवाई करून या संशयास्पद घटनेचा पर्दाफाश केला. या यशामुळे एक मोठा धोका टळला आणि राज्याच्या सागरी सुरक्षेतील सजगतेचा आदर्श निर्माण झाला.
पाकिस्तानमधून आलेली मुकद्दर 99 नावाची बोट खोल समुद्रातून भारतीय जलसीमेपर्यंत येते आणि मग रायगडच्या रेवदंडा किनाऱ्यावर बोया दिसतो..ही घटना केवळ योगायोग मानता येणार नाही. यामागे काहीतरी निश्चित नियोजन आणि भारतविरोधी कारस्थान असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थलांतरित मजुरांबाबत अधिक दक्षता आवश्यक
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामं, विशेषतः महामार्ग आणि रस्ते उभारणीचं काम सुरू आहे. यामुळे अनेक बाहेरील कामगार, स्थलांतरित मजूर, आणि परप्रांतीय व्यक्ती या भागात वास्तव्यास येत आहेत. त्यांचं योग्य रेकॉर्ड प्रशासनाकडे असणं ही काळाची गरज आहे.
प्रत्येक अशा व्यक्तीची ओळख, त्यांच्या आधार कार्डची प्रत, त्यांची वास्तव्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली गेली पाहिजे. यामध्ये स्थानिक ग्रामपंचायतींची आणि ठेकेदारांची जबाबदारीही निश्चित असावी. गावांमध्ये कोण येतंय, कोण राहातंय, कोणत्या कामासाठी आहे, याचा सखोल तपास केला गेला नाही, तर हीच दुर्लक्ष भविष्यात मोठ्या धोक्याचे कारण ठरू शकते.
नागरिकांनीही सजग राहावे
रायगड पोलिसांच्या या यशस्वी कारवाईबरोबरच आता नागरिकांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची ठरते. कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू, किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. गावपातळीवर देखील सतर्क नागरिक समिती कार्यरत केली जावी.
रायगड पोलिस अधीक्षक आचल दलाल व त्यांच्या टीमने दाखवलेली तत्परता आणि देशभक्ती ही कौतुकास्पद आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे एक मोठा धोका टळला. मात्र, हीच घटना आपल्याला सजगतेचा आणि सुसंवादाचा धडा देते. पोलिस, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास आणि सहकार्य हेच आपल्या सुरक्षेचं खरं कवच आहे.