सत्ता, स्वार्थ आणि सैतानी विचारांचा कळस तिसऱ्या अपत्यामुळे निवडणूक बुडू नये म्हणून पित्यानेच सात वर्षांच्या लेकीचा बळी घेतला? नांदेड हादरलं… माणुसकी सुन्न झाली

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ नांदेड (PTI)
  • 📅 रविवार , १ फेब्रुवारी २६

नांदेड जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर समाजाच्या अंतःकरणाला काळीमा फासणारी माणुसकीची हत्या आहे. जन्म देणाऱ्या पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला मृत्यूच्या दाढेत ढकलल्याची ही घटना ऐकून मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि संताप उफाळून येतो.

स्वतःच्या रक्ताच्या नात्याला, मायेच्या स्पर्शाला आणि पित्याच्या छायेला विसरून एका बापाने आपल्या लेकीला थेट कॅनलमध्ये फेकून दिलं… आणि तोही निवडणूक, सत्ता, प्रतिष्ठा यांसारख्या स्वार्थी गणितांसाठी—ही बाबच माणूस म्हणून आपल्याला लाजवणारी आहे.

पांडुरंग कोंडामंगले (वय ३२) असं आरोपीचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावचा रहिवासी. हातावर पोट असलेला, कटिंगचं दुकान चालवणारा हा व्यक्ती… बाहेरून साधा, पण आतून अमानुष निघेल, याची कुणालाच कल्पना नव्हती.

तीन दिवसांपूर्वी त्याने पत्नीला “साहित्य घ्यायला जातो” असं सांगितलं. सोबत घेतली ती आपल्या काळजाच्या तुकड्यासारखी सात वर्षांची प्राची. ती निष्पाप चिमुकली—जिला अजून जग कळालं नव्हतं, स्वप्नं फुलायची होती—तिला थेट तेलंगणा राज्यातील बोधन रोड परिसरात नेण्यात आलं. आणि क्षणातच त्या चिमुकलीचं आयुष्य कॅनलच्या पाण्यात संपवण्यात आलं.

मुलीला मृत्यूच्या हवाली करून आरोपी पित्याने घरी परत येत नेहमीसारखं वागण्याचा प्रयत्न केला. पण नियतीनं त्याचा हा अमानुष चेहरा उघड केलाच.

कॅनलमध्ये एका चिमुकलीचा मृतदेह आढळल्याची बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशी दरम्यान संशयाची सुई थेट पित्याकडे वळली. अखेर ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेडमध्ये येऊन पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेतलं… आणि बाप असण्याचा मुखवटा फाटला.

या हत्येचं नेमकं कारण अद्याप तपासाअंती स्पष्ट झालेलं नाही. मात्र, गावात आणि तालुक्यात भयंकर चर्चा सुरू आहे. आरोपी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी तयारी करत होता. त्याला तीन अपत्ये असल्याने, निवडणुकीत अडथळा येऊ नये—या विकृत विचारातूनच लेकीचा बळी दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जर ही बाब खरी ठरली, तर हा गुन्हा केवळ हत्या न राहता, सत्तेच्या हव्यासातून केलेला अमानुष नरसंहार ठरेल.

आज प्रश्न उभे राहतात— 👉 सत्ता इतकी महत्त्वाची आहे का, की तिच्यासाठी लेक मारावी?

👉 कायदा, नियम आणि निवडणुकीचं राजकारण माणुसकीपेक्षा मोठं झालं आहे का?

👉 निष्पाप मुलांच्या जीवाला किंमत उरली नाही का?

नांदेड सुन्न… माणुसकी हादरली

या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरून गेला आहे. प्रत्येक आई-बापाच्या मनात भीती आहे, तर प्रत्येक संवेदनशील माणसाच्या डोळ्यात अश्रू. प्राचीचा मृत्यू अपघात नाही, ती समाजाच्या अपयशाची साक्ष आहे.

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सत्य लवकरच समोर येईल. पण तोपर्यंत एक गोष्ट निश्चित

या घटनेने माणुसकीला आरसा दाखवला आहे… आणि तो आरसा फारच भयानक आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *