संपादकीय: ‘हनी ट्रॅप’ सायबर काळातील नवा धोका

छावा, संपादकीय | दि. १२ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा)
विकसित होणाऱ्या डिजिटल युगात तंत्रज्ञान जितकं आपलं जीवन सुलभ करतंय, तितकंच ते आपल्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतंय. सोशल मीडियावरील वाढती आगंतुक मैत्री आणि ओळखीचे आभासी जाळं यामुळे “हनी ट्रॅप” सारख्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात दरवर्षी दोन लाखांहून अधिक नागरिक याच सायबर जाळ्यात अडकत असून, त्यांचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत आह.
हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?
एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून (बहुधा बनावट स्त्रीच्या ओळखीने) सोशल मीडियावर मैत्रीचा प्रस्ताव दिला जातो. संवाद वाढतो, विश्वास बसतो, आणि मग सुरू होते खाजगी माहितीची देवाणघेवाण. या संवादातून व्हिडिओ कॉल, खाजगी फोटो, किंवा संवेदनशील माहिती मिळवून पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं. काही प्रकरणांमध्ये तर फसवणूक इतकी गंभीर झाली आहे की पीडितांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे.
या प्रकाराला अटकाव घालण्यासाठी फक्त कायदेशीर पातळीवर उपाय पुरेसे नाहीत. सर्वसामान्य नागरिकांनी स्वतः सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक सोशल मीडिया वापरकर्त्याने आपले प्रोफाइल खासगी ठेवावे, अनोळखी व्यक्तींकडून आलेले मेसेज, कॉल किंवा फॉलो रिक्वेस्ट्स सतर्कतेने हाताळाव्या. ‘फूटप्रिंट’चा भान ठेवून इंटरनेटवर काहीही शेअर करण्याआधी दोनदा विचार करावा.
त्याचबरोबर, शासन व पोलिस प्रशासनानेही यासाठी जनजागृती मोहीम, कार्यशाळा आणि शालेय–महाविद्यालयीन पातळीवर माहिती सत्रं आयोजित करावी. सायबर गुन्हेगारीविरोधी उपाय योजनांचे प्रचार व प्रशिक्षण वाढवले पाहिजे.
आपल्या एका चुकीच्या क्लिकमुळे आयुष्यभराची शांतता हिरावली जाऊ शकते. म्हणूनच, ‘हनी ट्रॅप’सारख्या सावधगिरी बाळगायला हवी. मैत्री ही खरी असेल, तर ती विश्वासातून वाढते – जाळ्यातून नव्हे.