संपादकीय – समुद्र मळलेला नाही, आपणच मळवतोय!

छावा, संपादकीय | दि. ८ जुलै(सचिन मयेकर)
समुद्रकिनाऱ्यावर अलीकडे वाढलेली घाण ही फक्त निसर्गातील भरती-ओहोटीची देण नव्हे, ती मानवी वागणुकीची सजीव प्रतिक्रिया आहे. भरतीच्या लाटांमुळे किनाऱ्यावर फेकल्या गेलेल्या प्लास्टिक, रॅपर्स, थर्माकोल आणि इतर घाणीकडे पाहिलं, की लक्षात येतं — ही घाण समुद्राने निर्माण केलेली नाही, आपणच तिचे सर्जक आहोत.
माणसाच्या शरीरात जेव्हा काही बिघाड होतो, तेव्हा तो उलटी करून ती घाण बाहेर टाकतो. त्यानंतरच त्याचं शरीर पूर्ववत होतं. हाच नियम निसर्गालाही लागू होतो. समुद्र आपल्याकडून घेतलेली घाण परत करतो — आणि ती परत येते किनाऱ्यावर, आपल्या पायाशी!
हे चित्र केवळ पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देत नाही, तर आपल्या जबाबदारीची आठवणही करून देतं. स्वच्छतेबाबत लोकांची उदासीनता, टाकून द्यायची सवय, ‘माझ्यामुळे काय फरक पडतो’ असा दृष्टीकोन — हे सगळं आज समुद्रकिनाऱ्याच्या गाळात आणि घाणीत प्रकट झालेलं दिसतं.
सागरी जैवविविधतेवर आणि मानवी आरोग्यावर या कचऱ्याचा थेट परिणाम होत आहे. मासेमारीसाठी असलेले भाग दूषित होत आहेत, पर्यटक नाहिसे होत आहेत आणि स्थानिक नागरिक आरोग्यविषयक त्रासांना सामोरे जात आहेत. तरीसुद्धा आपण अजूनही “प्लास्टिक बंदी”, केवळ घोषणांपुरते मर्यादित राहिलो आहोत.
वेळ आली आहे की, आपण फक्त यंत्रणांकडे बोट दाखवणं थांबवून स्वतःकडे पाहिलं पाहिजे. समुद्रात जे टाकतो, तेच शेवटी परत आपल्यालाच मिळतं — ही गोष्ट आपण जितक्या लवकर समजून घेऊ, तितकं आपल्या पर्यावरणाचं आणि पुढच्या पिढ्यांचं रक्षण होईल.
समुद्र मळलेला नाही, तो आपली मळवलेली वृत्ती दाखवत आहे. हे दृश्य पाहूनही आपण बदललो नाही, तर निसर्ग आपलं उत्तर अधिक कठोरपणे देईल.