संपादकीय – मिठेखार दरड दुर्घटना

मिठेखार दरड दुर्घटना शासनाच्या निष्काळजीपणाने गाडलं विठाबाईंचं आयुष्य.
लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल
दिनांक – १९ ऑगस्ट २०२५
रायगड जिल्ह्यावर मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. रेड अलर्टच्या छायेतच आज सकाळी मुरूड तालुक्यातील मिठेखार गावात डोंगर घसरून वृद्ध महिला विठाबाई मोतिराम गायकर (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला.
ही दुर्घटना केवळ एका कुटुंबावर आलेलं दु:ख नाही, तर संपूर्ण गावाच्या हृदयावर कोरलेली जखम आहे.
सकाळी विठाबाई आपल्या दुकानात होत्या. अचानक डोंगरातून मोठा आवाज आला. त्या आवाजाचं कारण पाहण्यासाठी त्या मागे गेल्या. काही क्षणांतच डोंगराचा मातीचा ढिगारा त्यांच्या छोट्याशा जगण्यावर कोसळला.
दुकानाची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि एका क्षणात गावाची ‘आई’ मानली जाणारी विठाबाई नाहीशा झाल्या.
त्यांच्या दुकानाजवळ रोज गप्पा मारणारे, हसणारे शेजारी आज रडत उभे होते. कुणाला शब्द सुचत नव्हते.
ही दुर्घटना विठाबाईंच्या नशिबात होती की शासनाच्या निष्काळजीपणात, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता.
२०१९ मध्येही अशीच दुर्घटना घडली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः गावात येऊन भूस्खलन टाळण्यासाठी भिंत उभारण्याचे आदेश दिले होते.
भिंत उभारण्यासाठी मंजुरीही मिळाली होती. पण…
पाच वर्ष उलटले, भिंत आजही कागदावरच आहे!
जर ती भिंत उभी राहिली असती, तर आज विठाबाई जिवंत असत्या… हे वाक्य गावकऱ्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनीच सांगितलं.
विठाबाईंच्या मृत्यूने गावात हळहळ तर पसरलीच, पण संतापही उसळला.
दरडीच्या छायेत आम्हाला जगायचं नाही.
शासनाचे प्रतिनिधी येतात, घोषणा करतात, फोटो काढतात आणि निघून जातात. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही.
ग्रामस्थांच्या संतापात भीती मिसळली होती. प्रत्येकाचा प्रश्न एकच –
आज विठाबाई गेल्या… उद्या आमचं काय?
मुरूड तहसीलदार आदेश ढापाल यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पण गावकऱ्यांच्या डोळ्यांतून एकच सवाल झळकत होता –
सूचना किती वेळा द्यायच्या? आदेश किती वेळा काढायचे? कामं कधी होणार?
आज विठाबाईंचं आयुष्य दरडीखाली गाडलं गेलं. उद्या अजून किती ‘विठाबाई’ शासनाच्या निष्काळजीपणाची किंमत मोजणार?
मिठेखारच्या घराघरांत आज दुःख आहे.
एका आईचा मृत्यू म्हणजे एका घराचं छत्र हरपणं. गावातलं एक हसतं-खेळतं रुप कायमचं हरपणं.
ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी आहे, पण त्याहून जास्त आहे तो शासनाविषयीचा राग आणि अविश्वास.
भिंत कधीच उभी राहिली नाही… पण आज दरडीने विठाबाईंचं आयुष्य गाडलं.
आता तरी शासन जागं होईल का?