संपादकीय: अभिमानाचे दुर्गवैभव – युनेस्को जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश

छावा, संपादकीय | दि. १३ जुलै (सचिन मयेकर – रेवदंडा)
जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र!
शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेले १२ शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत, ही बाब केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची आहे.
‘Maratha Military Landscape of India’ या योजनेअंतर्गत युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूमधील जिंजी या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे.
ही दुर्गरचना केवळ वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून नव्हे, तर रणनिती, संरक्षण, स्वराज्य संकल्पना आणि स्थानिक लोकांच्या सहभागाने उभारलेली एक परंपरा आहे. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या दुर्गशक्तीच्या माध्यमातून त्यांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. त्यांचे हे सैनिकी दूरदृष्टीचे उदाहरण आता जागतिक पातळीवर पोहोचले आहे.
ही घोषणा म्हणजे इतिहासाचे केवळ स्मरण नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी संरक्षण, जतन आणि जागृतीचे पाऊल आहे. जागतिक वारसा यादीतील समावेशामुळे या किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय पर्यटन, संशोधन आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन तसेच युनेस्को यांचे विशेष आभार मानावे लागतील, ज्यांनी या ऐतिहासिक संपत्तीचे महत्त्व ओळखून तिच्या जागतिक स्थानाला मान्यता दिली.
शिवछत्रपतींच्या अमर पराक्रमाचे हे स्मारक आता जगभर ओळखले जाणार, हे महाराष्ट्राच्या आणि प्रत्येक शिवप्रेमीच्या अभिमानात भर घालणारे ठरेल.