शोकातून उभारी सुमित्र पतसंस्थेला नवे नेतृत्व खलिल तांडेल अध्यक्ष हेमांगी साखळे उपाध्यक्ष बिनविरोध
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रेवदंडा 9 एप्रिल २०२६

दुःखाच्या छायेतून उभारी घेत सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने नव्या नेतृत्वाची निवड करत पुढील वाटचालीचा निर्धार व्यक्त केला. गुरुवारी (दि. ९ एप्रिल २०२६) सकाळी साडेअकरा वाजता पतसंस्थेच्या कार्यालयीन सभागृहात पार पडलेल्या सभेत अध्यक्षपदी खलिल इनुस तांडेल, तर उपाध्यक्षपदी हेमांगी अभिजीत साखळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सचिन मयेकर.
निवड प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार पार पडली. प्राधिकृत अधिकारी तथा मुख्य लिपिक चेतन पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. अध्यक्षपदासाठी खलिल तांडेल यांच्या नावाचा प्रस्ताव संचालक राजन वाडकर यांनी मांडला, तर अनुमोदन संचालक महेंद्र नाईक यांनी दिले. उपाध्यक्षपदासाठी हेमांगी साखळे यांच्या नावालाही एकमताने संमती देत त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
सभेला संचालक मंडळातील महेंद्र कमळाकर नाईक, उमेश रामचंद्र कोंडे, राजेंद्र सदाशिव वाडकर, अशोक जया हवालदार, विजय सखाराम चौलकर, सदानंद शंकर घरत, प्रतिभा शरद वरसोलकर, कमरजब्बीन मुज्जफर मुकादम, अनिस ए.एस. हाजते, प्रतिभा प्रकाश सुर्वे आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक नागावकर, व्यवस्थापक क्रांती जाधव व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
एक हाती सांभाळलेला कारभार… आणि अचानक निर्माण झालेली पोकळी
सुमित्र पतसंस्थेचा कारभार सुरुवातीपासूनच कैलासवासी कमलाकर गोविंद साखळे (आप्पा) यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एकहाती आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे गेला. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे, पारदर्शक व्यवहारामुळे आणि ठाम निर्णयक्षमतेमुळे पतसंस्थेने विश्वासार्हतेची वेगळी ओळख निर्माण केली होती.
मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने संस्थेमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्व हरपल्याची जाणीव संचालक मंडळासह खातेदारांमध्येही प्रकर्षाने होती. आप्पांनी उभा केलेला पारदर्शक कारभार आणि शिस्त हीच संस्थेची खरी ताकद होती — आणि त्यांची उणीव भविष्यातही जाणवत राहणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना वंदन करतच पुढील निवड प्रक्रिया पार पडली.
दुःखाच्या काळातही “कार्य थांबता कामा नये” या भावनेतून संस्थेचे कामकाज अखंडित ठेवण्यासाठी ही निवड आवश्यक असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले. नव्या नेतृत्वाकडून आप्पांनी उभारलेल्या विश्वासाच्या पायावर पुढे जात पतसंस्थेच्या प्रगतीला नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
![]()

