शिवरायांची रणश्री भाग ३ तोरणा जिंकला आणि स्वराज्याची रणश्री गुंजली

“हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहे.
लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन.”
“हर हर महादेव”
ही गर्जना ऐकली की शत्रूचेही धैर्य कोलमडून जात असे.
आणि हीच गर्जना दुमदुमली होती तोरण्याच्या लढाईत.
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५
तोरणा – डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला गड, हिरव्यागार अरण्यांनी वेढलेला, आकाशाशी भिडणारा.
परंतु त्यावर वर्चस्व होते आदिलशाहीचे.
गुलामगिरीची ती सावली काढून टाकणं हेच शिवबांच्या डोळ्यातलं स्वप्न होत
धुकं गडाच्या कड्यावर झोपल्यागत पसरलं होतं.
मावळ्यांचे पाय सावकाश पण ठामपणे पुढे सरकत होते.
प्रत्येकाच्या हातात भाला, तलवार, कुणाच्या खांद्यावर धनुष्य-बाण.
चेहऱ्यावर दाटलेला घाम पण डोळ्यात प्रज्वलित स्वराज्याचा ज्वालामुखी.
शिवबांच्या डोळ्यातही तोच तेज होता –
“आज ही पहिली झुंज आहे, आजच रणश्री वाजली नाही तर स्वराज्याचं स्वप्न मरून जाईल!”
गडावर रखवालदार सावध झाले, रणधुमाळी पेटली.
तलवारींवरून ठिणग्यांचा पाऊस पडत होता.
मावळ्यांची पावलं गडाच्या दगडावर आदळत होती जणू पृथ्वीच डोलावी.
“धावा रे मावळ्यांनो भगवा फडकला पाहिजे” शिवबांचा आवाज रणशिंगापेक्षाही घणघणीत!
त्या क्षणी प्रत्येक मावळा रणांगणावर फक्त सैनिक नव्हता
तो होता स्वराज्याचा एक शिलेदार, स्वराज्याचा स्वप्नवेडा!
कोणी आपली छाती तलवारीसाठी पुढे करत होते, कोणी रक्ताच्या थेंबांनी भगवा भिजवत होते.
आणि अखेर…
तो क्षण आला –
तोरण्याच्या माथ्यावर भगवा फडकला!
डोंगररांगांनीही जणू जयजयकार केला –
“जय भवानी! जय शिवराय!”
तोरण्याच्या या विजयाने एकाच वेळी दोन गोष्टी घडल्या –
आदिलशाहीच्या मनात भिती निर्माण झाली.
मराठा जनतेच्या मनात स्वराज्याच्या आशेचा दिवा प्रज्वलित झाला.
शिवबांनी त्या क्षणी मावळ्यांकडे पाहून सांगितलं “हा गड आपला आहे. आता या गडावरून स्वराज्याची रणश्री दुमदुमणार! हा फक्त गड नाही, हे स्वराज्याचं पहिलं मंदिर आहे!”
त्या दिवशी तोरणा फक्त जिंकला नाही
त्या दिवशी महाराष्ट्राचं मन जिंकलं गेलं!
आणि रणश्रीची गाथा कायमची अमर झाली.