शिवप्रेमींसाठी सुवर्णसंधी…..
छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किटचा भव्य शुभारंभ
शिवराज्याभिषेकदिनी प्रेरणादायी इतिहासयात्रेला सुरुवात
छावा| मुंबई, दि. ९ | प्रतिनिधी
भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रा अंतर्गत सुरु झालेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट’ या विशेष रेल्वेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याला “प्रेरणादायी प्रवास” अशी संज्ञा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाशी नव्या पिढीला जोडण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे सांगितले.
या गौरव सर्किटमध्ये 700 हून अधिक पर्यटक सहभागी झाले असून त्यातील ८०% प्रवासी ४० वर्षांखालील आहेत. यामुळे नव्या पिढीला थेट ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याची, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे या गौरव यात्रेचा प्रारंभ शिवराज्याभिषेक दिनी झाल्यामुळे या प्रवासाला अधिक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “शिवनेरीपासून रायगडपर्यंतचा हा प्रवास केवळ ऐतिहासिक स्थळदर्शन नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे.” या सर्किटमध्ये लालमहाल, शिवसृष्टी (पुणे), भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला आदी महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे.
या वेळी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे, रेल्वेचे जीएम धर्मवीर मीना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी मनोज कुमार सूर्यवंशी, तसेच आयआरसीटीसी व पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे स्थानकावर पर्यटकांचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यांना फुलांचा गुच्छ व माहितीपत्रके देऊन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती देण्यात आली.
पाच दिवसांचा सशक्त ऐतिहासिक प्रवास
या यात्रेदरम्यान पर्यटक शिवनेरी किल्ला (जन्मस्थळ), रायगड (राज्याभिषेक स्थळ), लाल महाल (बालपण), शिवसृष्टी (जीवनदर्शन), भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड (अफझल खान युद्धस्थळ), कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला (बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक) या ठिकाणी भेट देणार आहेत.
भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ पर्यटन नव्हे, तर इतिहासाशी नाळ जोडणारा संस्कृतिक उपक्रम ठरत आहे. आयआरसीटीसीच्या सहकार्याने प्रवासदरम्यान प्रवाशांना सतत मार्गदर्शन व आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत.