शाळांमधून स्टार्टअप संस्कृतीकडे वाटचाल
‘सक्षम’ ठरतोय परिवर्तनाचा मंत्र
♦ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना
छावा | मुंबई, ९ जून | विशेष प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सहकार्याने उद्यम लर्निंग फाउंडेशन मार्फत नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील शासकीय व अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेला ‘सक्षम’ उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील मानसिकता विकसित करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल ठरला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकार झाली असून, गेल्या दोन वर्षांत या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात लक्षणीय सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
उद्यम लर्निंग फाउंडेशन ही मेकिन महेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली ना-नफा तत्वावरील संस्था असून, १४ ते २५ वयोगटातील युवकांमध्ये प्रकल्पाधारित शिक्षणाद्वारे उद्यमशील कौशल्ये आणि मानसिकता विकसित करणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे अध्यापन कौशल्य वाढवण्यासाठीही प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.
‘सक्षम’ कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, आत्मविश्वास, समस्या सोडवण्याची क्षमता आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश राज्यातील १७ हजार शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून सुमारे ४५ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आहे. आतापर्यंत देशातील १२ राज्यांतील २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या माध्यमातून उद्योजकीय शिक्षण दिले गेले आहे.
नागपूर जिल्ह्यातील निवडक ३० शाळांमध्ये २०२३-२४ मध्ये पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला. यामध्ये ४० प्रकल्पांचे प्रदर्शन, तर अमरावती जिल्ह्यातील २१२ शाळांमधील ८,००० विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम राबविण्यात आला. यशस्वी परिणाम पाहता २०२५-२६ मध्ये या उपक्रमाचा विस्तार ४०० शाळांमध्ये करण्यात येणार आहे.
‘सक्षम’ उपक्रमाच्या प्रभावीतेची ठळक आकडेवारी:
- १५,००० विद्यार्थ्यांचा सहभाग
- २,५०० पेक्षा अधिक व्यवसाय कल्पनांची मांडणी
- १,५०० प्रोटोटाइपची निर्मिती
- ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्पादनांची प्रत्यक्ष विक्री
- ५०० शिक्षकांना उद्यम प्रशिक्षण
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार आणि स्टार्टअपच्या संकल्पना आत्मसात केल्या असून, शालेय जीवनातच उद्यमशीलतेचे बीज रोवले जात असल्याचे दिसून येत आहे. या बदलाचा अनुभव नागपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “शालेय जीवनातच उद्यमशिलतेचे संस्कार रुजविणारा हा एक यशस्वी प्रयत्न ठरला असून, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि दृष्टिकोन या उपक्रमामुळे बदलला आहे.
राज्यात दरवर्षी सुमारे १४ लाख युवक नवीन मनुष्यबळामध्ये दाखल होत असताना, त्यांना उपयुक्त कौशल्ये व उद्योजकीय क्षमतांचे प्रशिक्षण देण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. ‘सक्षम’ सारख्या उपक्रमामुळे शिक्षणव्यवस्थेतून उद्योजकतेचा पाया घालण्याचा राज्य शासनाचा उद्देश अधिक ठोस होत असून, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून याचा व्यापक प्रसार करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.
“शालेय जीवनातच उद्यमशिलतेचे संस्कार रुजविणारा हा एक यशस्वी प्रयत्न ठरला असून, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि दृष्टिकोन या उपक्रमामुळे बदलला आहे.” सौम्या शर्मा, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी : नागपूर जिल्हा परिषद