विश्वासघाताची परिसीमा! जावयानेच आखला खुनाचा कट; रायगड पोलिसांचा ४८ तासांत मोठा ब्रेकथ्रू 🚨 BREAKING | चौल खून प्रकरण उघड — जावई मास्टरमाइंड, चौघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 रविवार , १ फेब्रुवारी २६
सोन्याच्या लालसेपोटी रक्ताच्या नात्यातील विश्वासघाताने चौल व रेवदंडा परिसर हादरून गेला असून, एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या खून व जबरी चोरी प्रकरणाचा रायगड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत यशस्वी उलगडा केला आहे. या धक्कादायक गुन्ह्यामागे मयत महिलेचा जावईच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्यासह चौघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सहा. पोलीस निरीक्षक (API) भैरू किसन जाधव, पोलीस अधिकारी दीपक म्हशीळकर,उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) माया मोरे, पोलीस मनीष ठाकूर, सिद्धेश म्हात्रे, पोलीस कुंभार, सुधीर पाटील, सुग्रीव गव्हाणे याच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास, पंचनामा व पाहणी केली होती.
घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक पथक व श्वान पथक (Dog Squad) घटनास्थळी पाचारण केले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी सूक्ष्म तपास करून रक्ताचे नमुने, झटापटीचे ठसे तसेच अन्य भौतिक पुरावे संकलित केले. श्वान पथकानेही घटनास्थळापासून परिसरात शोधमोहीम राबवत संशयितांच्या हालचालींबाबत दिशा मिळवण्याचा प्रयत्न केला. या तांत्रिक तपासामुळे गुन्ह्याची दिशा निश्चित होण्यास मदत झाली असून पुढील तपासाला वेग मिळाला.

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील चौल येथील टेकाळकर आळी येथे एकट्याच राहत असलेल्या मंदा प्रमोद म्हात्रे (वय ७०) या वृद्ध महिला दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या पूर्वी आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. घरात घुसखोरी करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून अंगावरील सोन्याचे दागिने जबरी चोरीने लुटल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी दि. २९ जानेवारी २०२६ रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
४८ तासांत पोलिसांचा धडाकेबाज तपास
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे (अलिबाग विभाग) तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तातडीने सक्रिय करण्यात आली.
सीडीआर (Call Detail Record) विश्लेषण, तांत्रिक तपास, सायबर माहिती आणि गोपनीय सूत्रांची माहिती यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींच्या हालचाली, संपर्क आणि प्रवासाचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.
घटनास्थळी मिळालेला बटन – तपासातील महत्त्वाचा दुवा
तपासादरम्यान घटनास्थळी आरोपीच्या शर्टाचे एक बटन सापडले होते. या बटनावरून थेट आरोपींची ओळख पटली नसली, तरीही हा पुरावा तपास अधिक सूक्ष्म करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. सदर शर्ट कुठे शिवण्यात आला असावा, याच्या अनुषंगाने स्थानिक टेलरकडेही चौकशी करण्यात आली. अशा लहान-लहान बारकाव्यांचा अभ्यास करत तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली.
चौघे आरोपी ताब्यात
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे
आरोपी क्र. १ महादेव ऊर्फ शिवा राधाकिसन ढोबळे (वय २५) यास आष्टी, जि. बीड येथून,
आरोपी क्र. २ अशोक अजिनाथ भोसले (वय १९) व
आरोपी क्र. ३ गणेश उत्तम पंडागळे (वय २५) यांना जाटदेवळा, ता. पाथडी,
तर आरोपी क्र. ४ शुभम एकनाथ पवार (वय २३) यास पेण, जि. रायगड येथून ताब्यात घेण्यात आले.
जावईच निघाला मास्टरमाइंड
चौकशीत मुख्य आरोपी हा मयत महिलेचा जावई असल्याचे उघड झाले आहे. वृद्ध महिला घरात एकट्या राहत असल्याची माहिती आरोपींना होती. सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी खुनाचा कट आखून हा गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरु जाधव करीत असून, खुनामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका व चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याबाबत तपास सुरू आहे.
पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
अवघ्या ४८ तासांत इतक्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आल्याने रायगड पोलिसांच्या तत्परतेचे व चाणाक्ष तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
![]()

