विमान कोसळलं, त्याच इमारतीत झोपली होती, अकोल्याच्या तरुणीचा कसा वाचला जीव? थरारक कहाणी समोर
छावा • अहमदाबाद,ता. १३ जून • प्रतिनिधी
अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात अकोल्याची विद्यार्थिनी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये झोपलेली असताना विमानाचा आवाज ऐकून ती जागी झाली आणि धुरातून सुरक्षित बाहेर पडली.गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून २०२५) भीषण विमान अपघात झाला. या विमान अपघातामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एअर इंडियाचं विमान (एआय १७१) कोसळलं. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, या अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल ही तरुणी थोडक्यात बचावली आहे. या अपघाताच्या वेळी ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथील हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीत आणि पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. ती डीएम ऑन्कोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.मोठा आवाज, सर्वत्र धूर
अपघाताच्या काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या ही झोपलेली असताना अचानक मोठा आवाज झाला. या मोठ्या आवाजाने ऐश्वर्या झोपेतून जागी झाली. तिने डोळे उघडताच सर्वत्र धुराचे लोट पसरलेले दिसले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ऐश्वर्याने जराही वेळ न घालवता स्वतःला एका ब्लँकेटमध्ये लपेटले.ती धुराच्या गर्दीतून आणि अंधारातून वाट काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरली. तिने कसाबसा आपला जीव वाचवला. या प्रयत्नात तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याच्या खुणा झाल्या आहेत. या घाबरलेल्या अवस्थेतही ऐश्वर्याने लगेच आपले वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन करून माहिती दिली. ऐश्वर्याच्या आई-वडिलांनी या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना ऐश्वर्यासाठी एका भयानक स्वप्नासारखी असली तरी तिच्या प्रसंगावधानामुळे ती मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडली आहे.
अहमदाबाद विमान अपघात
अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानी परिसरात आज 12 जून 2025 रोजी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान लंडनकडे जात होते आणि टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच ते कोसळले. या विमानात दोन पायलट
आणि 10 क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी होते. या विमान अपघातात 50 प्रवासी ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टेक ऑफनंतर विमान सुमारे 600 फूट उंचीवर गेले आणि त्यानंतर अचानक खाली कोसळू लागले. काही क्षणांतच हे विमान एका रहिवासी भागात कोसळले आणि त्याला आग लागली. हे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले, त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही इजा झाली. या फ्लाइटमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही प्रवास करत होते.