विटीदांडू – हरवलेला खेळ, जपलेल्या आठवणी

उन्हाच्या तडाख्यात रस्त्यावरच्या धुळीत घोळणारी मुलं… हातात लांबट डंडा, जमिनीवर छोटासा गिल्ला आणि एक… दोन… तीन! अशी आरोळी ठोकली की खेळ सुरू व्हायचा. हा होता आपला गावोगावचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेला विटीदांडू.

सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल

        दि. २० ऑगस्ट २५

लहानसा डंडा हवेत उडवून मोठ्या डंड्याने मारण्याचा तो क्षण म्हणजे जणू बालपणाच्या आकाशात झेप घेणं होतं. गिल्ला दूरवर गेला की मित्रांच्या आनंदाने आरडाओरड व्हायची, धावपळ व्हायची. कोण गिल्ला पकडणार, कोण धावणार, कोण जिंकणार याची पर्वा कुणाला नव्हती खरी मजा होती ती त्या खेळाच्या सोबतीची.

या खेळाने मुलांमध्ये वेग, चपळाई, धाडस आणि अंदाज घेण्याची क्षमता वाढली. भांडणं झाली तरी दोन क्षणात हशा फुटायचा. गल्लीच्या टोकाला बसलेले वडीलधारी ओरडायचे  रस्त्यात खेळू नका रे! पण ती ओरड सुद्धा खेळाचाच भाग वाटायची.

आज मात्र या गल्लीतला गोंगाट हरवला आहे. मोबाईल, व्हिडिओ गेम्स, टीव्ही यांच्या आहारी गेलेल्या पिढीला विटीदांडू, लगोरी, भेंड्या यांची गंमत कळणार तरी कशी? शरीराने खेळून, धावून, घाम गाळून, मातीच्या अंगणात लोळून वाढायचं ते दिवस केवळ आठवणींत उरले आहेत.

विटीदांडू म्हणजे केवळ खेळ नव्हता, तर तो बालपणाचा उत्सव होता. त्या फटक्यात दडलेलं होतं धैर्य, स्पर्धा, हसणं-खिदळणं आणि मैत्रीचं गोड बंधन. आज जर कुणी हातात डंडा दिला, तर आपलं हरवलेलं बालपण डोळ्यांसमोर उभं राहतं.

कानावर पुन्हा घुमतो तोच आवाज

चल, गिल्ला टाक… फटका मार…

आणि जाणवतं  खरं तर बालपण कधीच हरवत नाही, ते फक्त आठवणीत दडलेलं असतं.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *