लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध नंतर धमक्या व बदनामीचा प्रयत्न

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – पेण, प्रतिनिधी — सोमवार —१५ डिसेंबर २०२५

पेण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल

पेण पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एका धक्कादायक प्रकरणात ओळखीच्या व्यक्तीकडून एका महिलेला शारीरिक व मानसिक छळ, गंभीर धमक्या तसेच बदनामीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर आरोपीने लग्नास स्पष्ट नकार देत पीडितेला धमकावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाची वेळ येताच त्याने अचानक माघार घेतली. त्यानंतर फिर्यादीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिल्यानंतर आरोपीने, “तुझे दुसऱ्या कोणाशीही लग्न मी होऊ देणार नाही” अशी गंभीर धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.इतकेच नव्हे तर, आरोपीने फिर्यादी व स्वतःचे एकत्रित फोटो अनोळखी मोबाईल क्रमांकावरून तिच्या पतीकडे पाठवण्याची धमकी देत तिची सामाजिक बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 275/2025 नोंदवण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम 69, 351(2) व 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वेगुर्लेकर करत असून आरोपीच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून पीडित महिलेला संरक्षणात्मक उपाययोजना पुरवण्यात आल्या आहेत.या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा धमक्या व बदनामीचे प्रकार महिलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून महिलांनी अशा प्रकारांविरोधात निर्भयपणे तक्रार दाखल करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *