लक्ष्मीपूजनातील पानाचं गूढ महत्त्व विसरलेली परंपरा अमोल वारसा
आजच्या आधुनिक दिवाळीत आपण इलेक्ट्रिक सजावट, फुलांच्या तोरणात, आणि नोटांच्या गड्ड्यांमध्ये हरवून गेलो आहोत. पण या सगळ्या चमकदार प्रकाशाच्या आड एक छोटं पान हिरवं पान शांतपणे आपली जागा निभावत असतं. हेच ते पान, जे आपल्या लक्ष्मीपूजनाच्या विधीत प्राचीन काळापासून सर्वात महत्त्वाचं स्थान राखून आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–संपादकीय मंगळवार – २१ ऑक्टोबर २०२५
पूर्वीच्या काळी, जेव्हा घरे झोपडीसारखी होती, पूजा मातीच्या दिव्याने होत असे, तेव्हा देवी लक्ष्मीचं आगमन या पानावरच होतं असं मानलं जायचं. पानावर सोनं, नाणी, तांदूळ, सुपारी ठेवली जायची. कारण पान हे शुद्ध, हिरवं आणि जीवनाचं प्रतीक आहे. जिथे हिरवाई आहे तिथे समृद्धी आहे आणि जिथे समृद्धी आहे तिथेच लक्ष्मीचा वास असतो पूर्वीच्या विधींमध्ये लक्ष्मीपूजनाच्या वेळी सोन्याच्या दागिन्यांखाली पान ठेवण्याची पद्धत होती. कारण पानावर ठेवलेलं सोनं म्हणजे देवीच्या चरणांवर अर्पण केलेलं सुवर्ण. देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते, आणि तिच्या पावलांना आसन देण्यासाठी हे पान अर्पण केलं जातं. पान म्हणजे नुसतं पान नव्हे — ते माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांचं प्रतीक आहे. याच्या सुगंधात वायू, हिरव्या रंगात पृथ्वी, त्याच्या ओलाव्यात पाणी, त्याच्या आरोग्यदायी गुणांत अग्नी, आणि त्याच्या वक्र आकारात आकाशाचं सौंदर्य सामावलेलं आहे. ऋग्वेदात आणि अथर्ववेदात पानाला “नागवल्ली” असं म्हटलं आहे. पानाचा वापर यज्ञ-हवनात, विवाहात, देवपूजेत, आणि औषधात होत असे. शास्त्रांनुसार, ज्या घरात लक्ष्मीपूजनाला पान ठेवतात, त्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. पान हे समृद्धी, आरोग्य आणि सौंदर्याचं प्रतीक. लक्ष्मीपूजनानंतर थोडं सुपारी, चुना आणि पान चघळणं ही जुनी प्रथा आहे. यात फक्त भक्ती नाही, तर विज्ञानही आहे. पानात जंतुनाशक गुणधर्म, पचनशक्ती वाढवणारे घटक, आणि ताजेतवाने ठेवणारी रासायनिक संयुगे आहेत. म्हणून देवीचं प्रसादरूप पान म्हणजे शुद्धता आणि आरोग्याचं आशीर्वाद! आजच्या पिढीला कदाचित वाटतं हे पान फक्त पूजेसाठी असतं.पण खरा अर्थ असा आहे हे पान म्हणजे आपल्या परंपरेचा जीवंत वारसा आहे. प्रत्येक पानात आपल्या संस्कृतीचा हिरवा ठसा आहे, जो आपल्याला सांगतो जिथे श्रद्धा आहे, तिथे समृद्धी आहे. जिथे परंपरा आहे, तिथे लक्ष्मी आहे. या दिवाळीत जेव्हा तुम्ही देवीच्या पायाशी ते हिरवं पान ठेवले आहे तेव्हा लक्षात ठेवा हे केवळ पूजेचं अन्न नाही, हे आहे शतकानुशतकांची संस्कृती, श्रद्धेचा प्रतीक आणि समृद्धीचा दरवाजा. पानावर ठेवलेलं सोनं सोनं बनवतं, पण श्रद्धेवर ठेवलेलं पान घर सोन्याचं बनवतं.
![]()

