रेवस–रेड्डी मार्गावर ‘मृत्यूचा सापळा’ खोदलेल्या रस्त्याने घेतला अलिबागच्या वनरक्षकाचा बळी

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा शनिवार ०७ मार्च २०२६
अलिबाग : रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणामुळे आणखी एक जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खोदून ठेवलेल्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे कार्यरत वनरक्षक सुरज सारंगे यांचा शुक्रवारी (दि.६) रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वनविभागात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मुरूड तालुक्यातील सर्व्हे येथील रहिवासी असलेले सुरज सारंगे हे कर्तव्यदक्ष व मनमिळावू स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. २०२२ पासून ते अलिबाग रेंजमधील तिनविरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ते दुचाकीवरून घरी जात असताना रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदलेल्या मोरीत त्यांची मोटारसायकल कोसळली. या अपघातात डाव्या बाजूच्या डोळ्याजवळ डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी जुळ्या अपत्यांचे आगमन झाले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे सारंगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, रेवदंडा पुलावरून उजव्या बाजूने मुरुडकडे जाताना चेकपोस्टपासून पुढे रस्ता खोदण्यात आला असून तेथे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने परिसर धोकादायक बनल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. काही ठिकाणी रस्ता दोन ते तीन फूट खोल करून एका बाजूने पूर्ण फोडलेला असून वाहनचालकांचा अंदाज चुकून गाड्या थेट खोदलेल्या नाल्यात जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
विशेष म्हणजे अशा ठिकाणी बॅरिकेट्स, सूचना फलक किंवा इशारे न लावल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाही सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने वाहनचालकांचे जीव धोक्यात घालण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या निष्काळजीपणामुळे अपघात होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
![]()

