रेवदंड्यात मुसळधार पावसाचा जोर — जनजीवनावर परिणाम

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
रेवदंडा परिसरात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज सकाळपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत चालू असलेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन काहीसं विस्कळीत झाले आहे.
गावात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. नागरिक घरातच थांबण्यास प्राधान्य देत आहेत. शाळा आणि लहान व्यवसायांवर याचा परिणाम जाणवत आहे.
तथापि, विजेचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांना सध्या त्या दृष्टीने अडचणी जाणवलेली नाहीत. हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासनाने शाळा अर्धवट सुटण्याचा निर्णय घेतला. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढत चालल्यामुळे शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.
पालक आणि शिक्षक वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.