रेवदंड्यात मटका जुगारावर पोलीस धाड दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —रेवदंडा, शनिवार — १३ डिसेंबर २०२५
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.१० वाजता धडक कारवाई करत छापा टाकला. ही कारवाई मौजे रेवदंडा, पार नाका येथे जनसेवा डेअरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत (ता. अलिबाग) करण्यात आली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १९४/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) प्रमाणे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचे फिर्यादी रुपेश बबन निगडे (वय ४१), पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड–अलिबाग आहेत.या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनंत शंकर पाटील (वय ५४, रा. ताजपूर, पोस्ट सुडकोली, ता. अलिबाग) असे आहे. त्याच्यासह आणखी एका आरोपीवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याबाबत पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनंत शंकर पाटील याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ३,८३० रुपये रोख रक्कम, तसेच आकडे मोड केलेल्या ११ चिठ्ठ्या असा एकूण ३,८३५ रुपयांचा जप्तमाल आढळून आला. हकीकत अशी की,वरील तारखेस, वेळी व ठिकाणी आरोपी हा पार नाका, रेवदंडा येथे जनसेवा डेअरीच्या बाजूला मोकळ्या जागेत लोकांकडून पैसे स्वीकारून चिठ्ठ्यांवर आकडेमोड लिहून “कल्याण मेन” नावाचा मटका जुगाराचा धंदा बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी चालवत असताना मिळून आला. या जुगारातून प्राप्त झालेली रोख रक्कम दुसऱ्या आरोपीकडे जमा केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक श्री. किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलीस नाईक क्र. २२९० एस. ए. गव्हाणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत.
![]()

