रेवदंड्यात पुन्हा स्वच्छता अभियान तब्बल २१.४ टन कचरा हटवला
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने, पद्मश्री व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि महाराष्ट्र भूषण डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये पुन्हा एकदा भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा — रविवार, २१ सप्टेंबर २०२५
या वेळी रेवदंडा बायपास रोड, समुद्र किनारा तसेच गावातील विविध अंतर्गत गल्ल्यांची मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. विशेषतः जुनी पोस्ट गल्ली, वाडी मोहल्ला, पगारमोहला मशीद परिसर, मोठा कोळीवाडा, मधला कोळीवाडा, भणसाळी आळी, आगर आळी, हरेश्र्वर स्मशानभूमी, ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा रस्ते या सर्व ठिकाणी दुतर्फा स्वच्छता करण्यात आली.
अभियानादरम्यान तब्बल २१.४ टन कचरा हटवण्यात आला आणि या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमामुळे समुद्र किनाऱ्यासह गावातील प्रमुख रस्ते व गल्ल्या पुन्हा एकदा स्वच्छतेने उजळून निघाल्या.
विशेष म्हणजे या उपक्रमात अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणांहून श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.स्वच्छता अभियानात ११०० च्या संख्येने अलिबाग तालुक्यातील सदस्य उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून श्रमदान केले.
कचरा व घाणीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि रोगराईला मिळणारे आमंत्रण या स्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणावर रोखले जाते. तसेच डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण होण्यास हातभार लागतो.
प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वच्छतेविषयी ठाम संकल्पना उभी राहावी यासाठीच हे स्वच्छता अभियान वेळोवेळी राबविले जात असून समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हा सतत चालणारा प्रयत्न आहे.
![]()




