रेवदंड्यात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप – चिखलामुळे भाविकांना मोठा पेचप्रसंग

रेवदंड्यात आज दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र या वेळी समुद्रकिनारी चिखल साचल्याने भाविकांना मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.
सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५
ग्रामपंचायतीने केला चिखल काढण्याचा प्रयत्न,पोलिसांचे सहकार्य आणि समीर आठवले यांचा पुढाकार
मारुती आली, विठोबा आली आणि परिसरातील सर्व गणेशमूर्ती पारनाका समुद्रकिनाऱ्याकडे निघाल्या. पण किनाऱ्यावरील चिखलामुळे विसर्जन करणे अवघड झाल्याने भाविकांना मोठे बंदर समुद्रकिनाऱ्यापर्यंत पायपीट करावी लागली. त्या ठिकाणी समुद्र स्वच्छ असल्याने अखेर तेथेच विसर्जन करण्यात आले.
रेवदंडा ग्रामपंचायतीने केला चिखल काढण्याचा प्रयत्न
दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनावेळी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला. ही समस्या सोडवण्यासाठी रेवदंडा ग्रामपंचायतीतर्फे जेसीबीच्या सहाय्याने किनाऱ्यावरचा चिखल काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भरतीमुळे हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. संध्याकाळी ओहोटी झाल्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने त्या मार्गाने विसर्जन करणे शक्य झाले नाही.
ग्रामपंचायतीचा हा तातडीने केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरला, तरीही नैसर्गिक परिस्थितीमुळे भाविकांना मोठे बंदर किनाऱ्यापर्यंत पायपीट करूनच विसर्जन करावे लागले.
पोलीस आणि ग्रामस्थांचे योगदान
रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश शिंदे, मनीष ठाकूर यांच्यासह पोलीस सहकाऱ्यांनी भाविकांना सुरक्षित मार्गदर्शन केले. तर ग्रामस्थ समीर आठवले यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेत मोठे बंदर किनाऱ्यावरील विसर्जन सुरळीत पार पाडले.
या परिस्थितीमुळे भाविकांना खूप अंतर चालत जावे लागले, अनेकांना मुश्किल सहन करावी लागली. मात्र शेवटी गणरायाचे विसर्जन भक्तिभावाने आणि सुरक्षितपणे करण्यात आले