रेवदंड्यात इंजिनिअर साहेबांच्या प्रयत्नांना सलाम – रेड अलर्टमध्येही विजेचा अखंड प्रवाह.

रेवदंडा विभागात आलेल्या मा. इंजिनिअर जितेंद्र पाटील साहेबांच्या कार्यतत्परतेमुळे विजेच्या व्यवस्थापनात ऐतिहासिक बदल घडून आला आहे. पूर्वी पावसाचा छोटासा शिंतोडा आला तरी विजेचा पुरवठा २४ तास खंडित व्हायचा. ग्रामस्थांना अंधारात दिवस काढावे लागत, वैद्यकीय सेवा, औद्योगिक कामे आणि दैनंदिन जीवन ठप्प व्हायचं.
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२१ ऑगस्ट २५
पण आता चित्र पूर्ण बदललं आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, नवीन पोल्स उभारणी, वायरींची सिस्टिमॅटिक मांडणी आणि नकाशावरून नियोजनबद्ध कामे राबवण्यात आली. परिणामी, आज बरेच दिवस पडत असलेल्या पावसातही रेवदंड्यात अखंड वीजपुरवठा सुरू होता.
यातले सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे बहिरी गल्लीमार्गे HT हाय-टेंशन लाईनचे काम. याआधी थेरोंडा HT लाईनमध्ये पोल पडले किंवा अडथळा आला की वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित होत असे. मात्र, साहेबांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बहिरी गल्लीमार्गे नवी HT लाईन टाकून कायमस्वरूपी उपाय केला.
या कामासाठी नागरिकांनीही मोठं सहकार्य दाखवलं. बहिरी गल्लीतील रहिवाशांनी झाडे तोडण्यास मदत केली. सहा-सात दिवस वीजपुरवठा बंद राहूनही कोणी तक्रार केली नाही. उलट, “रेवदंडा अंधारात राहणार नाही” या विश्वासाने सर्वांनी कामात साथ दिली. शेवटी, श्रीफळ वाढवून या HT लाईनचे विधिवत उद्घाटन झाले आणि आता त्यावरून थेट रेवदंडा मार्केट व हरेश्वर परिसराला अखंड वीजपुरवठा सुरु झाला आहे.
अपरिहार्य कारणास्तव कधी लाईट खंडित झाली तरी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने तात्काळ पुरवठा पुन्हा सुरू होतो. मात्र HT लाईनवर मोठा फॉल झाला तर परिस्थिती वेगळी असते. तरीही रेवदंडा अंधारात न राहावा यासाठी साहेब व कर्मचारी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत.
ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाच्या जिभेवर आज एकच बोल
👉 मनःपूर्वक धन्यवाद!
मा इंजिनिअर जितेंद्र पाटील साहेब, सर्व कर्मचारी, लाइनमन, कॉन्ट्रॅक्टर आणि संपूर्ण MSEB टीम तुमच्यामुळेच आज रेवदंडा उजळलाय.